![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।। महाराष्ट्रात मे महिन्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसमोर आता हवामानाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एका बाजूला उष्णतेची लाट अंग भाजत असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ४८ ते ७२ तासांत हवामान अचानक बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
कोकणात पुन्हा एकदा उष्ण आणि दमट हवामानाचा जोर वाढणार असून, मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवेतील आर्द्रता प्रचंड वाढणार असल्याने उकाडा असह्य होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र उकाड्यासोबतच वादळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर गडगडाटी पावसाचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातही हवामानाचा विचित्र खेळ सुरूच असून, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेचा पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भाला झोडपणारे अवकाळी संकट आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाकडे सरकल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला असून, विजा, वादळी वारे आणि अचानक होणाऱ्या पावसापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही पिके आणि साठवणूक सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
