होर्मुझ पेटलं, जग धडधडलं! ; ३ युद्धनौकांवर हल्ला, ट्रम्प यांचा मोठ्या कारवाईचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।। US Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा बारुदाचा वास पसरला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने जगाची झोप उडवली आहे. युद्धविरामाला अवघा महिना पूर्ण होत असतानाच गुरुवारी तीन अमेरिकी युद्धनौकांवर हल्ला झाल्याचा आरोप अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणवर केला आणि गल्फच्या पाण्यात पुन्हा युद्धाचे ढग दाटून आले. शांतता चर्चेचे गोडवे गाणारे डोनाल्ड ट्रम्प एकीकडे “सर्व काही सकारात्मक सुरू आहे” असे सांगत होते, तर दुसऱ्याच दिवशी समुद्रात तोफांचा आवाज घुमू लागल्याने अमेरिकन प्रशासन संतापाने लालबुंद झाले आहे. होर्मुझ ही केवळ सामुद्रधुनी नाही; तर जगाच्या तेलवाहतुकीची धमनाच मानली जाते. त्या धमनित पुन्हा तणावाचे गुठळे तयार होऊ लागल्याने जागतिक बाजारपेठेपासून राजकारणापर्यंत सर्वत्र खळबळ उडाली आहे. “शांततेच्या चर्चेला समुद्रातच टॉर्पेडो लागलं,” अशी उपरोधिक चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगू लागली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर इराणला थेट इशाराच दिला आहे. “करारावर स्वाक्षरी केली नाही तर भविष्यात अतिशय भीषण आणि अधिक आक्रमक हल्ले केले जातील,” असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत, “आज परवानगी दिली तर उद्या त्याचा वापर होईल,” असा इशारा दिला. मात्र अमेरिकी सैन्याने इराणचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावल्याचा दावा केला असून युद्धनौकांचे मोठे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे इराणने मात्र उलट अमेरिकेवरच नागरी वस्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन जहाजांवर अमेरिकेने कारवाई केल्याचे सांगत तेहरानने सीमाभागात हवाई संरक्षण प्रणाली सज्ज केली आहे. त्यामुळे गल्फच्या आकाशात आता शांततेपेक्षा संशयाचीच विमाने अधिक फिरताना दिसत आहेत. दोन्ही देश “युद्ध नको” असे म्हणत असले, तरी त्यांच्या भाषेतून बारुदाचा धूर स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी आले आहे. संघर्ष संपवून गल्फ प्रदेशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी युद्धविराम, होर्मुझमधील तणावावर कायमस्वरूपी तोडगा आणि ३० दिवसांच्या शस्त्रसंधीचा करार हे तीन प्रमुख मुद्दे चर्चेत आहेत. पण प्रत्येक वेळी चर्चेच्या टेबलावर आशेचा दिवा लागतो आणि काही तासांतच समुद्रात गोळ्यांचा आवाज घुमू लागतो. अमेरिका इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा आणि होर्मुझमधून मुक्त वाहतूक सुरू राहील याची हमी द्यावी, या भूमिकेवर ठाम आहे. तर इराण भविष्यात चर्चेला तयार असल्याचे सांगत अमेरिकेने नाकेबंदी हटवावी, अशी मागणी करत आहे. या संघर्षात दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम उभे असले, तरी जग मात्र धास्तावलेल्या नजरेने होर्मुझकडे पाहत आहे. कारण तिथे पेटणारी एक ठिणगी जागतिक अर्थव्यवस्थेच्या कोठारालाच आग लावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *