![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।। Gold Silver Prices: लग्नसराईची चाहूल लागताच बाजारात नेहमी हसत येणारं सोनं यंदा मात्र रुसून बसल्यासारखं वागू लागलं आहे. घसरण थांबली आणि सोन्याने पुन्हा एकदा जोरदार कलाटणी घेतल्याने खरेदीदारांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांची नफावसुली या सगळ्यांचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसत आहे. विशेष म्हणजे, या वर्षात सोनं तब्बल १८ हजार रुपयांनी महाग झाल्याने “लग्न करायचं की सोनं पाहायचं?” असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. बाजारात सोनं आता फक्त दागिना राहिलं नाही, तर ते अक्षरशः भावनेऐवजी गणिताचा विषय बनलं आहे.
शनिवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आणि प्रति औंस भाव ४७१५ डॉलरच्या आसपास पोहोचला. मात्र देशांतर्गत बाजारात, विशेषतः दिल्लीच्या सराफा बाजारात, काहीशी घसरण नोंदवली गेली. तरीही एमसीएक्सवर सोन्याने पुन्हा उसळी घेत गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला. चांदीनेही मागे राहायचं ठरवलं नाही आणि तीही रॉकेटसारखी वर झेपावली. २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,४७० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट १,३८,३९० रुपये आणि १८ कॅरेट १,१३,३१० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा किलोदरही २,६१,००० रुपयांच्या आसपास फिरताना दिसत आहे. बाजारात जणू सोनं-चांदी दोन्ही “स्पर्धा कुणाशी करायची नाही, फक्त वर जायचं!” या मूडमध्ये आहेत.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसतोय तो मध्यमवर्गीय कुटुंबांना. कारण लग्नसराई जवळ येत असताना दागिन्यांच्या खरेदीचा हिशेब आता हळूहळू बजेटच्या बाहेर जाऊ लागला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या या उड्या आणखी अस्वस्थ करत आहेत. एकेकाळी “थोडं थोडं सोनं घेत जाऊ” असं म्हणणारे आता “थोडं कमी लग्न करू” अशी मिश्कील चर्चा करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात १८ हजारांची वाढ आणि चांदीत २५ हजारांची उसळी पाहता, गुंतवणूकदार खुश असले तरी ग्राहक मात्र बुचकळ्यात पडले आहेत. बाजारात सोनं आता सौंदर्याचा नव्हे तर आर्थिक सामर्थ्याचा आरसा बनत चाललं आहे. लग्नाच्या मंडपात सजणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा त्यांची किंमतच जास्त चर्चा निर्माण करत आहे.
