Tech Layoffs: एआय आलं, नोकऱ्यांचं दार बंद झालं!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।। Cloudflare Layoffs : एकेकाळी आयटी क्षेत्र म्हणजे सोन्याची खाण मानली जायची. हातात लॅपटॉप, गळ्यात आयडी कार्ड आणि महिन्याच्या शेवटी भरघोस पगार, एवढंच स्वप्न लाखो तरुणांच्या डोळ्यांत असायचं. पण आता त्याच आयटी क्षेत्रावर बेरोजगारीचे काळे ढग इतके दाटले आहेत, की सकाळी ऑफिसचा लॉगिन करण्याआधीच “तुमची सेवा संपुष्टात आली आहे” असा मेल कर्मचाऱ्यांच्या इनबॉक्समध्ये धडकू लागला आहे. सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील मोठी कंपनी क्लाउडफ्लेअरने तब्बल २० टक्के कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातील ११०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे कंपनीने कोणतीही गोलमाल भाषा न वापरता थेट सांगितले — “एआयमुळे ही नोकर कपात करावी लागत आहे.” एकेकाळी मशीन माणसाचे काम हलके करेल असे सांगितले जात होते; पण आता मशीनच माणसाच्या खुर्चीकडे डोळा लावून बसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

क्लाउडफ्लेअरचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये हा निर्णय “कठीण पण भविष्यासाठी आवश्यक” असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तब्बल सातपट वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंजिनिअरिंगपासून HR, फायनान्स आणि मार्केटिंगपर्यंत अनेक विभागांतील रोजची कामे आता एआय करत असल्याने मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी होत चालल्याचे वास्तव समोर आले आहे. गंमत म्हणजे ही कपात कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे नाही, तर “एजंटिक एआय युगासाठी” तयारी म्हणून केली जात असल्याचे कंपनी सांगते आहे. म्हणजे आधी माणसांनी मशीन तयार केली आणि आता तीच मशीन माणसांना “धन्यवाद, पुढे जाऊ शकता” म्हणू लागली आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांची अवस्था सध्या लग्नात वाजणाऱ्या बँडवाल्यासारखी झाली आहे — आवाज मोठा, पण स्वतःच्या भवितव्याचा सूर हरवलेला!

दरम्यान, कंपनीने नोकर कपात झालेल्या कर्मचाऱ्यांना काही दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्ण मूळ वेतन, आरोग्य विमा आणि शेअर्ससंबंधी सवलती देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण नोकरी गेल्यावर पगाराचा दिलासा किती दिवस मनाला आधार देणार, हा खरा प्रश्न आहे. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांतच १२० टेक कंपन्यांमधून तब्बल १ लाख १ हजार ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. गूगल, ओरॅकल, पेपल, ॲमेझॉन, कॉइनबेससारख्या दिग्गज कंपन्याही या यादीत आहेत. एआयच्या नावाखाली कंपन्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्त काम उरकण्याच्या मॉडेलकडे वळत आहेत. त्यामुळे जगभरातील आयटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आता एकच प्रश्न दिसतो आहे — “पुढचा मेल माझ्यासाठी तर नाही ना?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *