![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।। सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी कायद्याच्या पुस्तकांपेक्षा आयुष्याच्या धड्यालाच अधिक वजन मिळालं. दिल्ली न्यायिक सेवा परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी करणाऱ्या वकील प्रेरणा गुप्ता यांची याचिका ऐकताना भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत अचानक भूतकाळात गेले आणि न्यायालयात असा प्रसंग उलगडला, की काही क्षण कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,” असं म्हणत त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का सांगायला सुरुवात केली. १९८४ साली कायद्याच्या अंतिम वर्षात असताना त्यांना न्यायिक अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती, मुलाखतीचं बोलावणंही आलं होतं. पण मुलाखतीच्या दिवशी एका वरिष्ठ न्यायाधीशांनी त्यांना दालनात बोलावलं आणि थेट विचारलं, “खरंच न्यायिक अधिकारी व्हायचं आहे?” सूर्यकांत यांनी “हो” म्हटल्यावर त्या न्यायाधीशांनी ताडकन उत्तर दिलं, “माझ्या दालनातून बाहेर पडा!” एका वाक्याने त्यांच्या स्वप्नांवर जणू हातोडाच कोसळला.
त्या क्षणाचं वर्णन करताना सरन्यायाधीश स्वतः भावूक झाले. “मी थरथरत बाहेर आलो. अपमानित वाटलं. करिअर संपल्यासारखं वाटलं,” असं त्यांनी सांगितलं. न्यायालयात बसलेले वकील, अधिकारी आणि उपस्थित लोक काही काळ स्तब्ध झाले. कारण न्यायमूर्तींच्या खुर्चीत बसलेला माणूसही कधीकाळी स्वप्नभंगाचा जखमी प्रवासी होता, हे त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं. मात्र आयुष्याने दुसऱ्याच दिवशी वेगळं वळण घेतलं. त्याच न्यायाधीशांनी पुन्हा बोलावून सांगितलं, “तू न्यायाधीश होऊ शकतोस; पण माझा सल्ला आहे, वकील हो. वकील संघटना तुझी वाट पाहते आहे.” हे वाक्यच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. त्यांनी मुलाखत देण्याचा निर्णय रद्द केला आणि पूर्ण ताकदीने वकिली क्षेत्रात झोकून दिलं. आई-वडिलांनाही सुरुवातीला काही सांगितलं नाही, कारण त्यांना दुःख होईल अशी भीती होती. पण ज्या धक्क्याने त्यांना रडवलं, त्याच धक्क्याने पुढे त्यांना देशाच्या सर्वोच्च न्यायासनापर्यंत पोहोचवलं.
किस्सा संपल्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी प्रेरणा गुप्ता यांच्याकडे पाहत शांतपणे विचारलं, “आता सांगा, मी चुकीचा निर्णय घेतला का?” त्या एका प्रश्नात अनुभव, संघर्ष आणि यशाचा पूर्ण इतिहास दडलेला होता. त्यानंतर खंडपीठाने याचिका फेटाळली; पण त्याचवेळी प्रेरणा गुप्ता यांना आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचाही सल्ला दिला. “एका पेपरवर आयुष्य अडकवू नका. वकिली क्षेत्रात खूप संधी आहेत,” असे शब्द त्यांनी दिले. गंमत म्हणजे याचिका हरल्यानंतरही प्रेरणा गुप्ता न्यायालयातून हसतमुखाने बाहेर पडल्या. कारण त्या दिवशी त्यांना निकालापेक्षा मोठा धडा मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयात त्या क्षणी कायद्याची भाषा नव्हे, तर आयुष्याची शहाणीव बोलत होती.
