तमिळनाडू सत्तासंघर्ष: दोन आमदारांनी खुर्ची अडवली! विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।।तमिळनाडूच्या राजकारणात सध्या असा तमाशा रंगला आहे, की बहुमताचा आकडा जणू लपाछपी खेळत आहे. निवडणुकीत १०८ जागा जिंकून तमिळगा वेत्री कळघम सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि अभिनेता ते नेता झालेल्या थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा रंगू लागल्या; पण सत्ता हाताशी येऊनही ती हातातून निसटताना दिसत आहे. कारण राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “११८ आमदारांचा लेखी पाठिंबा दाखवा, मगच शपथविधी!” विजय यांनी बहुमताचा दावा करत राजभवन गाठले खरे; पण पडताळणी झाली तेव्हा आकडा ११८ ऐवजी ११६ वरच अडखळला. दोन आमदारांनी जणू मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीखालील चाकंच काढून घेतली आणि सत्तेचा रथ राजभवनाच्या गेटवरच अडकला. “१०८ जागा जिंकल्या, पण दोन आकड्यांनी घात केला,” अशी चर्चा आता चेन्नईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्यपालांनी “११३ किंवा ११६ आमदारांवर स्थिर सरकार चालत नाही,” अशी ठाम भूमिका घेत विजय यांच्या शपथविधीला पुन्हा ब्रेक लावला आहे. या सत्तासंघर्षात मित्रपक्षांनीही शेवटच्या क्षणी हात आखडता घेतल्याने विजय यांची अडचण वाढली आहे. आययूएमएल आणि टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमकेने टीव्हीकेपासून अंतर राखत पाठिंबा नाकारला. एवढंच नाही, तर एएमएमकेने थेट राज्यपालांना पत्र लिहून एआयएडीएमकेला सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी केली. राजकारणात मैत्री आणि गणित दोन्ही वेळेप्रमाणे बदलतात, याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे. डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला, काँग्रेसच्या पाच आमदारांनीही साथ दिली; पण बहुमताचा दरवाजा उघडण्यासाठी लागणारी दोन किल्ल्या अजूनही सापडलेल्या नाहीत. त्यामुळे विजय यांच्या समर्थकांचा उत्साह आता संभ्रमात बदलताना दिसत आहे.
दरम्यान, टीव्हीकेच्या आमदार मेरी विल्सन यांनी “विजय पुढील पाच वर्षेच नव्हे, तर पुढेही मुख्यमंत्री राहतील,” असा आत्मविश्वास व्यक्त केला असला, तरी सध्या तमिळनाडूच्या राजकारणात अनिश्चिततेचे ढग अधिक गडद दिसत आहेत. राजभवनात आकड्यांची बेरीज सुरू आहे आणि पक्षांच्या दालनात फोनची घंटा थांबायचे नाव घेत नाही. दोन आमदारांच्या कमतरतेमुळे संपूर्ण सत्तासमीकरण कसे उलटेपालटे होते, याचा हा जणू राजकीय धडा ठरत आहे. अभिनेता म्हणून पडद्यावर शेकडो गुंडांना हरवणाऱ्या विजय यांच्यासमोर आता खरी कसोटी राजकारणाच्या रंगमंचावर उभी राहिली आहे. कारण इथे टाळ्यांनी सत्ता मिळत नाही; तर प्रत्येक आमदाराच्या सहीची किंमत मोजावी लागते. तमिळनाडूत सध्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी असली, तरी तिच्याभोवतीचा राजकीय खेळ मात्र रंगात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *