![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे २०२६ ।। सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या, अर्जांचे गठ्ठे आणि सहीच्या शोधात मारलेले हेलपाटे — पीएफ काढताना कर्मचाऱ्यांची जी अवस्था होत होती, ती आता इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO आता आपल्या ७.८ कोटी खातेधारकांसाठी अशी सुविधा आणत आहे की, पीएफचा पैसा थेट ATM मधून काढता येणार आहे! मे महिन्याच्या अखेरीपासून EPFO 3.0 या नव्या डिजिटल योजनेअंतर्गत ATM आणि UPI द्वारे पीएफ व्यवहार सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे आता “माझे पैसे, पण काढायला परवानगी कोणाची?” हा प्रश्न संपणार आहे. मोबाईलवर दोन क्लिक आणि ATM वर चार बटणे दाबली की पीएफचा पैसा हातात! सरकारी यंत्रणांच्या संथ गतीला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा म्हणजे अक्षरशः दिलास्याचा श्वास ठरणार आहे.
EPFO 3.0 या नव्या व्यवस्थेमुळे पीएफशी संबंधित जवळपास सर्व प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस होणार आहेत. २०२६ च्या मध्यापर्यंत ही प्रणाली पूर्णपणे लागू होण्याची शक्यता आहे. सध्या पीएफ क्लेम मंजूर होण्यासाठी दहा ते वीस दिवस लागतात; पण नव्या प्रणालीत पाच लाख रुपयांपर्यंतचे क्लेम थेट ऑटोमेटिक पद्धतीने मंजूर केले जाणार आहेत. त्यामुळे केवळ दोन ते पाच दिवसांत पैसे खात्यात जमा होऊ शकतात. आधारशी जोडलेल्या खात्यांसाठी पासबुक, चेक किंवा इतर कागदपत्रांचे फोटो अपलोड करण्याची गरजही राहणार नाही. सर्व व्यवहार पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. EPFO सदस्यांना खास ATM कार्ड दिले जाणार असून ते थेट पीएफ खात्याशी जोडले जाईल. या कार्डद्वारे ATM मधून रोख रक्कम काढता येईल. त्याचबरोबर PhonePe, Google Pay आणि इतर UPI अॅप्सद्वारेही पीएफची रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर करता येणार आहे. सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नोकरी बदलणाऱ्यांसाठीही ही योजना मोठा दिलासा घेऊन येत आहे. आतापर्यंत पीएफ ट्रान्सफरसाठी जुन्या आणि नव्या कंपनीच्या दारात हेलपाटे मारावे लागत होते; पण आता PF बॅलन्स आपोआप नव्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे. मात्र या सुविधांसाठी UAN सक्रिय असणे आणि ते आधार, PAN तसेच बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक राहणार आहे. नोकरी गेल्यास एक महिन्यानंतर पीएफमधील ७५ टक्के रक्कम काढता येईल, तर उर्वरित २५ टक्के दोन महिन्यांनी मिळणार आहे. तज्ज्ञ मात्र सावधगिरीचा इशारा देत आहेत. पीएफ ही केवळ बचत नसून निवृत्तीची आधारवडासारखी तरतूद आहे. त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज दीर्घकाळात मोठा निधी उभा करते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच पीएफला हात लावावा, असा सल्ला दिला जात आहे. पाच वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यानंतर पीएफ काढल्यास करही लागणार नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातात केवळ ATM कार्ड येणार नाही, तर त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची एक नवी चावीही येणार आहे.
