![]()
महाराष्ट्र्र 24 : ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड, दि. १२ मे २०२६ : आजच्या स्वार्थाच्या बाजारात माणुसकीचे मोल पैशाच्या काट्यावर तोलले जात असताना, काही महान आत्मे आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास मानवतेच्या चरणी अर्पण करून जातात आणि म्हणूनच त्यांची स्मृती ही केवळ छायाचित्रांत बंदिस्त राहत नाही, तर ती जनमानसाच्या हृदयावर कोरली जाते. अशाच प्रेम, करुणा आणि आत्मज्ञानाच्या अखंड ज्योतीचे प्रतीक ठरलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंहजी यांच्या पावन स्मृतीस अर्पित ‘समर्पण दिवस’ बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी हरियाणातील समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात होणारा हा कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा महासागर ठरणार आहे. देश-विदेशातून हजारो श्रद्धाळू या प्रसंगी उपस्थित राहून बाबाजींना कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करणार आहेत. कार्यक्रमानंतर सतगुरु माताजींचे आशीर्वचन ऐकण्याची संधी लाभणार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून जगभरातील श्रद्धाळूंना या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेता येणार आहे.

