![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे २०२६ ।। Aadhaar Card News: देशात आधार कार्ड हे आता केवळ ओळखपत्र राहिलेलं नाही, तर सामान्य माणसाच्या आयुष्याचं प्रवेशद्वार बनलं आहे. बँक खाते उघडायचं असो, मोबाईल सिम घ्यायचं असो किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळवायचा असो — “आधार आहे का?” हा प्रश्न आता जन्मतारखेइतकाच कायमस्वरूपी झाला आहे! पण अनेकदा कागदपत्रांच्या गोंधळामुळे नागरिकांना आधार केंद्राबाहेर हेलपाटे मारावे लागत होते. कोणाचं नाव जुळत नव्हतं, तर कोणाचा पत्ता बदलला होता; काहींची कागदपत्रं “मान्य नाहीत” म्हणून फाईल परत यायची. आता मात्र Unique Identification Authority of India अर्थात UIDAI ने नियमांत मोठा बदल करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन आधार नोंदणी आणि अपडेटसाठी आता अधिक कागदपत्रांना मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे सामान्य माणसाचा त्रास कमी होणार आहे. सरकारी कार्यालयांच्या दारात “उद्या या” ऐकून कंटाळलेल्या जनतेसाठी ही बातमी म्हणजे उन्हातल्या प्रवाशाला थंड पाण्याचा घोटच म्हणावा लागेल.
UIDAI ने नव्या नियमांत विविध श्रेणीतील लोकांसाठी स्वतंत्र कागदपत्रांची यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे ‘चाईल्ड केअर इन्स्टिट्यूट’मध्ये राहणाऱ्या मुलांसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र आता वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारलं जाणार आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींशी संबंधित कागदपत्रांनाही प्रथमच अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्या कागदोपत्री जगात अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घटकांनाही आता ओळखीचं अधिकृत दार उघडू लागलं आहे. परदेशी भारतीय नागरिक कार्डधारकांना आधार नोंदणीसाठी वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणं आवश्यक असणार आहे. नाव अपडेट करण्यासाठी पासपोर्ट हा सर्वात प्रभावी दस्तऐवज मानला जाणार असून, त्यासोबत पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र आणि लग्नानंतर नाव बदलल्यास मॅरेज सर्टिफिकेटलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारी यंत्रणांनी कागदपत्रांच्या बाबतीत इतकी उदार भूमिका घेतल्याचं पाहून अनेकांना आता “खरंच सरकार बदललं की काय?” असा प्रश्न पडू लागला आहे.
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्रासोबत १० वी-१२ वीची गुणपत्रिका, पासपोर्ट आणि जन्मतारीख स्पष्ट असलेली सरकारी ओळखपत्रं मान्य असतील. पत्ता अपडेटसाठी पासपोर्ट, बँक पासबुक, अलीकडील बँक स्टेटमेंट, वीज-पाणी-गॅस बिल, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, हाऊस टॅक्स पावती आणि भाडेकरूंना रेंट एग्रीमेंटसोबत पोलीस व्हेरिफिकेशन किंवा नोटरी दस्तऐवज वापरता येणार आहेत. म्हणजे आता “कागदपत्र कमी पडले” या एका वाक्याने काम अडण्याचे प्रकार काही प्रमाणात कमी होण्याची आशा आहे. मात्र नागरिकांनीही आधार अपडेट करताना काळजी घेणं गरजेचं आहे. मूळ कागदपत्रं सोबत ठेवणं, मोबाईल नंबर योग्य देणं आणि फक्त अधिकृत आधार केंद्रावरच जाणं आवश्यक आहे. कारण भारतात फॉर्म भरताना एक छोटी चूक झाली, तर ती दुरुस्त करण्यासाठी माणसाला स्वतःच्या जन्मकुंडलीपेक्षाही जास्त कागदपत्रं जमा करावी लागतात, हा अनुभव अनेकांनी घेतलेलाच आहे!
