लॉकडाऊनमुळे सोन्याच्या तस्करीला लगाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ सप्टेंबर – कडक लॉकडाऊनमुळे देशात तस्करीच्या मार्गाने येणारे सोने कमी झाले आहे. दरवर्षी अंदाजे 120 टन सोने तस्करीच्या मार्गाने देशात येते. मात्र यावर्षी फक्त 25 टक्के सोने येईल. म्हणजेच सोन्याची तस्करी सुमारे 80 टक्के घटेल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केला आहे.

25 मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक ठप्प झाली. परिणामी अवैध शिपमेंट पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे सोन्याच्या तस्करीला लगाम बसलाय. प्रति महिना सुमारे दोन टन सोन्याची तस्करी सध्या होत आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक एन. अनंता पद्माभन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या बॉर्डरवरून तस्करी होते. चोख सुरक्षाव्यवस्थेमुळे बॉर्डरवर रस्ते मार्गाने होणारी तस्करी नियंत्रणात आली आहे. विमानतळांच्या माध्यमातून होणारी तस्करी कमी असते. एप्रिल महिन्यात विमानतळांकरून फक्त 20.6 किलो सोने पकडले आहे. गेल्या सहा वर्षांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

आयात शुल्क चुकवण्यासाठी…सोन्याचे वाढते दर आणि आयातीवर 12.5 टक्के शुल्कासह अतिरिक्त स्थानिक कर यामुळे सोन्याची बेकायदेशीर खरेदी वाढली आहे. त्यामुळे तस्करांना फायदा होतो. तस्करीच्या मार्गाने सोने येऊ नये, यासाठी ज्वेलर्स गेल्या अनेक वर्षांपासून आयात शुल्कात 50 टक्के कपात करण्याची मागणी करत आहेत.

…तर तस्करी वाढेल … एन. अनंता पद्माभन यांच्या मते, विमानसेवा पूर्णपणे सुरू झाल्यावर पुन्हा तस्करी वाढेल. श्रीलंका सरकारने गेल्या महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क रद्द केले आहे. मात्र तरीही सोन्याची तस्करी वाढू शकते. बोटीने अवघ्या 45 मिनिटांत श्रीलंकेतून दक्षिण हिंदुस्थानात पोचता येते. अशातच तस्करांचे ऑपरेशन सुरू होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *