महावितरणची दमदार योजना ! अडीच हजारांत २५ वर्ष मोफत वीज ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे २०२६ ।। महागाईच्या काळात सामान्य माणसाच्या आयुष्यात जर कुठली गोष्ट महिन्याच्यासुरुवातीलाच धडकी भरवते, तर ती म्हणजे वीजबिल! घरात दोन पंखे, एक टीव्ही आणि फ्रिज असला तरी बिल हातात आलं की माणूस मीटरकडे संशयाने पाहू लागतो. अशा वेळी महावितरणने आणलेली ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप (स्मार्ट)’ योजना ही अनेकांसाठी जणू उन्हातल्या सावलीसारखी ठरत आहे. फक्त अडीच हजार रुपये भरून तब्बल २५ वर्षे मोफत वीज मिळणार, हे ऐकून अनेकांना सुरुवातीला “ही सरकारी योजना आहे की स्वप्न?” असा प्रश्न पडला आहे. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे ही योजना प्रत्यक्षात उतरवली जात असून दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून दिला जाणार आहे. म्हणजे आता छतावर बसलेला सोलर पॅनल हा केवळ श्रीमंतांच्या बंगल्याचा शोभेचा भाग राहणार नाही, तर सामान्यांच्या घराचा ‘कमावता सदस्य’ बनणार आहे.

या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. बारामती परिमंडळात आतापर्यंत हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. बारामती, सातारा आणि सोलापूर विभागातील लोकांनी या योजनेकडे आशेने पाहायला सुरुवात केली आहे. कारण महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना म्हणजे अक्षरशः आर्थिक क्रांती ठरू शकते. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळतेच; त्यात राज्य सरकारकडूनही अतिरिक्त मदत मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केंद्राचे ३० हजार आणि राज्याचे १७ हजार ५०० रुपये अनुदान मिळणार असल्याने त्यांना फक्त २,५०० रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांना केवळ ५ हजार, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये भरावे लागणार आहेत. बाकीचा खर्च सरकार उचलणार! म्हणजे आतापर्यंत घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे फक्त उन्हाळ्याच्या त्रासाने पाहणारा माणूस आता त्याच सूर्याला “घरचा कमावता” म्हणू लागणार आहे.

या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” हे तत्त्व. म्हणजे सरकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवशी धावपळ करणाऱ्यांनी यावेळी आधीच जागं व्हायला हवं. कारण राज्यातील सुमारे पाच लाख ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि अर्जांची संख्या वेगाने वाढत आहे. महावितरणने केवळ मोफत वीज देण्याचा विचार केलेला नाही, तर अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचाही मार्ग खुला केला आहे. म्हणजे भविष्यात घराच्या छतावरचा सोलर पॅनल हा फक्त वीजबचतीचा उपाय राहणार नाही, तर तो छोटासा “ऊर्जा उद्योग” ठरू शकतो. सरकारच्या योजनांकडे अनेकदा लोक संशयाने पाहतात; पण ही योजना जर प्रभावीपणे राबवली गेली, तर महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उजेड पडू शकतो. कारण आजच्या काळात फक्त घरात वीज असणं महत्त्वाचं नाही, तर वीजबिलाची भीती नसणं त्याहून महत्त्वाचं झालं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *