महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे २०२६ ।। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णय ठरवणारी NEET परीक्षा अखेर पेपरफुटीच्या दलदलीत कोसळली आणि शिक्षण व्यवस्थेच्या चेहऱ्यावरच काळं फासून गेली. डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका येण्याआधीच ती दलालांच्या बाजारात पोहोचली. एक-दोन शहरांत नव्हे, तर अनेक राज्यांत पेपरफुटीचं जाळं पसरल्याचं उघड झालं आणि अखेर सरकारलाही परीक्षा रद्द करण्याचा कडवा निर्णय घ्यावा लागला. ३ मे रोजी झालेली परीक्षा आता रद्द झाली असून २१ जून रोजी नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. पण विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे — “आमचा दोष काय?” अभ्यासाच्या टेबलावर बसून घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पराभव झाला आणि कॉपीच्या बाजारात व्यवहार करणाऱ्या माफियांनी पुन्हा एकदा व्यवस्थेला गुडघ्यावर बसवलं.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांसमोर येत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं सांगितलं. सरकारने तीन-चार दिवस विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना नव्या परीक्षेसाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. पण विद्यार्थ्यांच्या जखमेवर ही १५ मिनिटं खरंच मलम ठरणार का? महिनोनमहिने अभ्यास करून मानसिक तणाव सहन केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच रणांगणात उतरावं लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था अशी झाली आहे की, पुस्तक उघडलं तरी प्रश्न दिसत नाहीत; दिसतो तो फक्त व्यवस्थेचा गोंधळ. सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका विकणाऱ्या टोळ्यांनी शिक्षणालाच बाजारपेठ बनवलं आणि सरकार आता त्या माफियांविरोधात लढाईची भाषा करत आहे.
या संपूर्ण प्रकरणाने भारतीय शिक्षणव्यवस्थेचं विदारक वास्तव पुन्हा उघड केलं आहे. परीक्षा म्हणजे गुणवत्तेची चाचणी राहिली नसून, ती आता व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा बनली आहे. लाखो पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी कर्ज काढून क्लासेस लावतात, विद्यार्थ्यांच्या झोपेचा, खेळाचा आणि तारुण्याचाही बळी दिला जातो; पण अखेरीस प्रश्नपत्रिका माफियांच्या हातात पोहोचते. मग मेहनतीचं मूल्य काय उरतं? सरकारने CBI चौकशी दिली, काहींना अटक झाली; पण विद्यार्थ्यांचा विश्वास परत आणणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण एकदा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास तुटला की, उत्तरपत्रिकेपेक्षा निराशेचंच वजन जास्त वाढतं. देशाला डॉक्टर घडवायचे आहेत की पेपरफुटीचे व्यापारी, हा प्रश्न आता थेट व्यवस्थेच्या दरबारात उभा ठाकला आहे.
