Vande Bharat: ‘मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर’चा नवा मार्ग; पुणे आणि सोलापूर मार्गे धावण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे २०२६ ।। मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी आजवर रेल्वेच्या प्रतीक्षायादीचा शाप आणि डब्यातील उभ्या प्रवासाची शिक्षा लिहिलेली होती. पण आता रेल्वे मंत्रालयाने जणू या त्रस्त प्रवाशांच्या वेदनांवर ‘वंदे भारत स्लीपर’चा मलमच लावला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा कंदील दाखवताच पुणे-सोलापूर मार्गे धावणाऱ्या या नव्या सुपरफास्ट स्लीपरची चर्चा महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत रंगली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि बंगळुरू या शहरांना जोडणारी ही रेल्वे म्हणजे केवळ ट्रेन नाही, तर दोन राज्यांच्या अर्थकारणाला जोडणारी लोखंडी जीवनवाहिनी ठरणार आहे. पुणेकरांसाठी तर ही रेल्वे म्हणजे आयटी कंपन्यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’नंतरचा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. कारण आतापर्यंत बंगळुरू गाठण्यासाठी १८-२० तास खर्च करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अवघ्या १४ तासांत पूर्ण होणार आहे. रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांनी काही आठवड्यांतच सेवा सुरू होण्याचे संकेत दिल्याने स्टेशनांवर चर्चा आणि सोशल मीडियावर अपेक्षांचा धुरळा उडाला आहे.

ही ट्रेन कोणत्या मार्गाने धावणार यावर गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या दालनात अक्षरशः राजकारण रंगले होते. मिरज-हुबळी मार्गाचा पर्याय चर्चेत होता; पण त्या मार्गावर प्रवाशांची संख्या अपेक्षेइतकी मिळणार नाही, अशी भीती अधिकाऱ्यांना सतावत होती. शिवाय तांत्रिक अडचणी, वेळापत्रकाचा गोंधळ आणि पुणे-सोलापूर वंदे भारतच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता होती. अखेर रेल्वे प्रशासनाने आकडेवारीचा आधार घेत पुणे-सोलापूर मार्गालाच पसंती दिली. कारण या पट्ट्यातील प्रवासी ‘प्रीमियम ट्रेन’साठी पैसे मोजायला तयार असतात, हे रेल्वेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आता वंदे भारत स्लीपरमध्ये चढताना प्रवाशांना एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवावी लागणार आहे—‘वेटिंग’वाल्यांना प्रवेश नाही! RAC आणि वेटिंग लिस्टचा भारतीय रेल्वेतील जुना लोकशाही हक्क या ट्रेनमध्ये चालणार नाही. फक्त कन्फर्म तिकीटवाल्यांनाच डब्यात पाय ठेवता येणार आहे. म्हणजेच, “तिकीट आहे का?” हा प्रश्न आता टीसीपेक्षा आधीच व्यवस्था विचारणार आहे.

या आलिशान वेगवान प्रवासाची किंमतही तितकीच झकास असणार आहे. राजधानी एक्सप्रेसपेक्षा तब्बल वीस टक्के अधिक भाडे आकारले जाणार असल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या दरानुसार, १००० किलोमीटरसाठी थर्ड एसीचे भाडे सुमारे २४०० रुपये असेल. सेकंड एसीसाठी ३१०० रुपये, तर फर्स्ट एसीसाठी तब्बल ३८०० रुपये मोजावे लागू शकतात. गंमत म्हणजे कमी अंतर प्रवास करणाऱ्यांनाही किमान ४०० किलोमीटरचे भाडे भरावे लागणार आहे. म्हणजे पुण्याहून थोडे पुढे उतरायचे असले तरी खिशातून ‘वंदे’च निघणार! मात्र रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि आधुनिक सुविधा पाहता प्रवासी हे अतिरिक्त पैसे आनंदाने मोजतील. आता पाहायचे इतकेच की, ही वंदे भारत स्लीपर खरोखरच प्रवाशांच्या स्वप्नांना वेग देते की फक्त रेल्वेच्या जाहिरातींनाच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *