LPG Price Hike?: गॅस सिलेंडर पुन्हा भडकणार? ग्राहक चिंतेत!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे २०२६ ।। LPG Price Hike? पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला आग लागलेली असताना आता स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरही महागाईचा नवा बॉम्ब ठरणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. मध्य-पूर्वेतील तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील संकटामुळे भारताच्या एलपीजी पुरवठ्याला मोठा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निक्केई आशियाच्या अहवालानुसार, भारतात दररोज तब्बल चार लाख बॅरल एलपीजीचा तुटवडा निर्माण होत आहे. फेब्रुवारी महिन्यात जिथे भारतात दररोज ८.५१ लाख बॅरल एलपीजी आयात होत होती, तिथे एप्रिलमध्ये हा आकडा थेट ३.७७ लाख बॅरलवर घसरला. म्हणजे गॅसचा नळ अजून बंद झालेला नसला तरी त्याचा दाब मात्र नक्कीच कमी झाला आहे. त्यामुळे “सिलेंडर कितीला?” हा प्रश्न आता पुन्हा घराघरांत चर्चेचा विषय ठरत आहे.

या संकटामागे केवळ जागतिक राजकारण नाही, तर भारताची परदेशी इंधनावरची मोठी अवलंबित्वाची जखमही उघडी पडली आहे. संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया या देशांकडून भारताला जवळपास ८० टक्के एलपीजी पुरवठा होतो. पण मध्य-पूर्वेतील अस्थिरतेमुळे या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना किंवा अमेरिकेकडे पाहिले जात असले तरी तेथून गॅस भारतात पोहोचायला २० ते ४५ दिवस लागतात. म्हणजेच, संकट वाढले तर तुटवडा आणि खर्च दोन्ही वाढणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्या तरी बाजारातील आकडे काही वेगळेच संकेत देत आहेत. तेल कंपन्यांना एका घरगुती सिलेंडरमागे तब्बल ६७४ रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपन्यांचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांचा ‘डबल अटॅक’ सरकारसमोर उभा ठाकला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर ६० रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यावेळीच ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता नव्या संकटामुळे आणखी दरवाढ झाली तर स्वयंपाकघरातील बजेट अक्षरशः कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण गॅस हा आता केवळ इंधन राहिलेला नाही, तर तो घरगुती अर्थकारणाचा कणा बनला आहे. भाज्यांचे दर वाढले, पेट्रोल महागले, विजेचे बिल फुगले आणि त्यात गॅस सिलेंडरही महागला तर सामान्य माणसाने जगायचे कसे, हा संतप्त सवाल पुन्हा पुढे येऊ लागला आहे. सरकार सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील धुमसती परिस्थिती पाहता ग्राहकांच्या कपाळावरील आठ्या मात्र वाढत चालल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *