![]()
पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीलाही महागाईची बाधा; मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणेतील वाहनचालक चिंतेत
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे २०२६ ।। महागाईच्या राक्षसाने आता सर्वसामान्यांच्या खिशावर असा काही पंजा मारला आहे की, माणूस रोज कमवतोय की रोज लुटला जातोय, हेच कळेनासं झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच जनतेचा जीव मेटाकुटीला आणला असताना आता सीएनजीनेही ‘मी काही कमी नाही’ असा थाट मांडत पुन्हा दरवाढीचा फटका दिला आहे. गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा सीएनजी महागला असून कालपर्यंत ८०.०९ रुपये प्रतिकिलो असलेला दर आता ८१.०९ रुपयांवर पोहोचला आहे. एका रुपयाची वाढ ऐकायला किरकोळ वाटत असली तरी रोजच्या जगण्याचा हिशोब मांडणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या खिशात मात्र ही वाढ जळजळीत भोक पाडणारी ठरत आहे.
१५ मे रोजी सरकारने सीएनजीच्या दरात तब्बल दोन रुपयांची वाढ केली. त्यानंतर १८ मे रोजी आणखी एका रुपयाची भर पडली आणि आता पुन्हा एक रुपया वाढवत दहा दिवसांत एकूण चार रुपयांचा बोजा नागरिकांच्या माथी मारण्यात आला आहे. महागाईचा हा वेग पाहता काही दिवसांत सीएनजीचे दर शंभरी गाठतील, अशी चर्चा वाहनचालकांमध्ये रंगू लागली आहे. रिक्षाचालक, कॅब चालक आणि छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित अक्षरशः कोलमडू लागले आहे. काही भागांत रिक्षाभाड्यात वाढ करण्यात आली असून त्याचा फटका आता थेट प्रवाशांच्या खिशालाही बसणार आहे. “सीएनजी स्वस्त म्हणून वाहन घेतलं, पण आता त्याचाच खर्च पेट्रोलच्या तोडीस तोड झाला,” अशी हतबल प्रतिक्रिया अनेक चालक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनीही जनतेला दिलासा दिलेला नाही. पेट्रोलमध्ये ८७ पैशांची तर डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. एकूण पाच रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिकांचा संताप उफाळून येत आहे. एका बाजूला सरकारकडून “इंधन तुटवडा नाही” अशी ग्वाही दिली जात असली तरी दुसऱ्या बाजूला वाढत्या दरांनी नागरिकांच्या खिशातला तुटवडा मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. घरखर्च, वाहनखर्च, प्रवासखर्च आणि महागाईचा वाढता डोंगर यामध्ये सामान्य माणूस अक्षरशः चिरडला जात आहे.
मुंबई आणि ठाण्यात सध्या सीएनजीचे दर ८१ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. पुण्यात हा दर ९२.५० रुपये असून साताऱ्यात ९५.५० रुपये प्रतिकिलो इतका आहे. कोल्हापूरमध्ये तर सीएनजीने ९६.९५ रुपयांचा टप्पा गाठला आहे. म्हणजे आता सीएनजीही “सामान्यांचा इंधन पर्याय” राहिलेला नसून तो श्रीमंतांच्या मर्जीचा विषय बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. महागाईच्या या भडकलेल्या आगीत सर्वसामान्य माणूस रोज भाजून निघत असताना सरकारच्या तिजोरीत मात्र करवाढीचे नवे नाणे खणखणताना ऐकू येत आहे.
