झोपेच्या टाकीतून लाखो लिटर पाण्याची गळती!

Spread the love

Loading

नागरिक तहानलेले; कर्मचारी निद्राधीन, संतापाचा उद्रेक

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी- दिनांक – 22 मे 2026- पिंपरी-चिंचवडच्या चिखली कृष्णानगर परिसरातील S-2 पाण्याच्या टाकीवर बुधवारी अक्षरशः बेजबाबदारपणाचा कळस पाहायला मिळाला. साने चौकातून रस्त्याने जात असताना रस्त्यावरून वाहणारे प्रचंड पाणी पाहून स्थानिक नागरिक आणि नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे यांनी थेट टाकीकडे धाव घेतली. तेथे पोहोचताच समोर आलेले दृश्य पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेली असती. लाखो लिटर पाणी टाकीतून ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत होते, तर जबाबदार कर्मचारी कपडे काढून निवांत झोपलेले दिसले. तब्बल अर्धा तास पाणी वाहून जात होते; पण टाकीवरील कर्मचाऱ्यांना त्याचा पत्ताही नव्हता. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारलेल्या यंत्रणेचा हा ‘आरामशीर कारभार’ पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे टाकीवर पोहोचताच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी झोपेतून उठत घाईघाईने मोटारी बंद करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला नागरिकांना “पाणी कमी आहे”, “प्रेशर नाही”, “पुरवठा मर्यादित आहे” अशी कारणे सांगितली जातात; तर दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी अशा निष्काळजीपणामुळे रस्त्यावर वाहून दिले जाते, हा कोणता न्याय? नागरिकांच्या घरात थेंबासाठी भांड्यांची रांग लागते आणि टाकीवर मात्र पाण्याचा महापूर वाहतो, हे चित्र संतापजनक आहे. या प्रकारामुळे मुद्दाम नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा दिला जात नसल्याचा संशय आता अधिक गडद झाला आहे. “आठवड्यातून किंवा महिन्यातून असे किती लाखो लिटर पाणी वाया जात असेल?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

 

या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे यांनी केली आहे. “नागरिक तहानलेले असताना अधिकारी आणि कर्मचारी झोपा काढत असतील, तर ही केवळ निष्काळजीपणा नाही तर जनतेशी केलेली प्रतारणा आहे,” असा घणाघात त्यांनी केला. दोषींवर दंडात्मक कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या प्रकारामुळे आता महापालिकेची झोप उडते की पुन्हा एखाद्या टाकीवरच झोप काढली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *