रेड अलर्टसमोर शिक्षण थांबले; पुणे–पिंपरीतील सर्व शाळा बंद, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जुलै २०२६ ।। पावसाचा इशारा आला की पूर्वी छत्री शोधली जायची; आता मात्र प्रशासनाला थेट शाळाच बंद कराव्या लागत आहेत. कारण निसर्गाचा मिजास बदलला आहे आणि त्याच्या रौद्र रूपापुढे कोणतीही व्यवस्था हतबल ठरत आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करताच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली. सुरुवातीला केवळ घाटमाथ्यावरील शाळांसाठी मर्यादित असलेला निर्णय शहरभर विस्तारावा लागला, यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. वर्गात घंटा वाजण्याऐवजी आज पावसाच्या सरीच उपस्थिती लावत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते, अंडरपास आणि पूल जलमय झाले आहेत. अनेक भागांत वाहतूक विस्कळीत झाली असून काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत शाळकरी मुलांचा प्रवास धोकादायक ठरू शकतो, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने सुट्टीचा आदेश जारी केला. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महापालिका शाळा, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच सर्व अंगणवाड्या दिवसभर बंद राहणार आहेत. हा निर्णय केवळ प्रशासनाचा आदेश नसून हजारो पालकांच्या चिंतेला दिलासा देणारा ठरला आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झाली असली तरी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र सुट्टी मिळालेली नाही. सर्वांनी नियमित कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोपविलेली कोणतीही जबाबदारी तातडीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी बंद असले, तरी आपत्ती व्यवस्थापनासाठी ते खुलेच राहणार आहेत. संकटाच्या काळात शिक्षकांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारीही निभावावी, असा या निर्णयामागील स्पष्ट संदेश आहे.
दरवर्षी पावसाळा येतो, रेड अलर्ट लागतो आणि शाळांना सुट्टी जाहीर होते; पण हा प्रश्न केवळ एका दिवसाच्या सुट्टीचा नाही. शहरातील जलनिस्सारण व्यवस्था, अतिक्रमण, अपुरी पायाभूत सुविधा आणि हवामानातील बदल यांचा गंभीर विचार करण्याची वेळ आता आली आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शिक्षणाचा हट्ट धरण्यापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणेच शहाणपणाचे आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना घरातच सुरक्षित ठेवावे, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कारण शाळेचा एखादा दिवस भरून निघू शकतो; पण जीवाची भरपाई कोणत्याही वर्गात शिकवली जात नाही.