मुंबई-पुणे अवघ्या नव्वद मिनिटांत धावणार!

Spread the love

Loading

अटल सेतू, जेएनपीटी, पुणे जोडणारा १५ हजार कोटींचा सुपरफास्ट कॉरिडॉर

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मे २०२६ ।। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रोजच्या वाहतूक कोंडीने आणि भीषण अपघातांनी प्रवाशांचा अक्षरशः जीव मेटाकुटीला आला असतानाच आता राज्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई ते पुणे अवघ्या ९० मिनिटांत गाठता यावे, यासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा नवा सुपरफास्ट द्रुतगती कॉरिडॉर उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. “मुंबई-पुणे अंतर आता वेळेच्या घड्याळात बसणार,” अशी चर्चा वाहतूक क्षेत्रात रंगू लागली आहे.

हा नवा आठपदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग रायगड जिल्ह्यातील चौक येथून सुरू होणार असून तो थेट पुणे बाह्यवळण मार्गावरील भोर तालुक्यातील शिवरे गावाशी जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे, जेएनपीटी बंदर आणि अटल सेतूशी हा मार्ग थेट जोडला जाणार असल्याने मालवाहतूक, औद्योगिक वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यांना अभूतपूर्व वेग मिळणार आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाढती वाहनसंख्या, दररोजची कोंडी आणि अपघातांचा वाढता आलेख प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेता नवा मार्ग अपरिहार्य मानला जात आहे. या नव्या कॉरिडॉरवर दररोज तब्बल तीन लाख वाहने धावू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या महामार्गामुळे केवळ मुंबई आणि पुणेच नव्हे, तर नवी मुंबई, जेएनपीटी बंदर, औद्योगिक वसाहती आणि आगामी आर्थिक कॉरिडॉर यांच्यातील संपर्क झपाट्याने वाढणार आहे. वाहतुकीसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने इंधन बचत, उद्योगांना वेग आणि मालवाहतुकीचा खर्च घटण्याची शक्यता आहे. “वेळ म्हणजे पैसा” हे वाक्य या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात उतरणार असल्याची भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सध्याच्या द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठीही हा पर्यायी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. दर काही दिवसांनी होणाऱ्या भीषण अपघातांमुळे प्रवाशांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी हा प्रकल्प ‘सेफ्टी कॉरिडॉर’ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे भविष्यात मुंबई ते बंगळुरू हा प्रवास अवघ्या सहा तासांच्या आत पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण हा नवा मार्ग आगामी मुंबई-बंगळुरू महामार्गाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक नकाशावर नव्या विकासमार्गाची रेषा उमटणार आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल, मार्गरेषा, भूसंपादन आणि बांधकामाचा अंतिम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाकडून या प्रकल्पाकडे अत्यंत महत्त्वाकांक्षी नजरेने पाहिले जात आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या रथाला आता वेगवान चाके मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *