WhatsApp नंबर लपला, आता नावावरच होणार गप्पा !

Spread the love

Loading

WhatsApp चा भन्नाट बदल; गोपनीयता वाढली, मोबाईल नंबरचा त्रास संपला

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।।मोबाईल नंबर दिल्याशिवाय WhatsApp वापरणं म्हणजे कालपर्यंत दिव्यच मानलं जात होतं. पण आता डिजिटल दुनियेत असा बदल घडला आहे की, “नंबर द्या” या वाक्याचीच सुट्टी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. WhatsApp ने युजर्ससाठी एक भन्नाट आणि गोपनीयतेला बळ देणारे नवे फीचर आणले असून आता मोबाईल नंबर लपवून केवळ युजरनेमच्या आधारे चॅटींग करता येणार आहे. म्हणजेच आता कुणालाही आपला वैयक्तिक नंबर न देता संवाद साधता येणार आहे. सोशल मीडियाच्या गर्दीत सतत वाढणारे फसवणुकीचे प्रकार, अनोळखी कॉल्स आणि नंबरचा गैरवापर यामुळे त्रस्त झालेल्या कोट्यवधी युजर्ससाठी ही सुविधा म्हणजे जणू डिजिटल कवचकुंडलेच ठरणार आहेत. “नंबर नाही, आता नाव पुरे!” अशीच भावना तरुणाईत उमटू लागली आहे.

WhatsApp हे आज केवळ चॅटींग अॅप राहिलेले नाही. घरापासून कार्यालयापर्यंत, शिक्षणापासून व्यवसायापर्यंत आणि प्रेमापासून राजकारणापर्यंत सर्व व्यवहार या हिरव्या अॅपवर येऊन विसावले आहेत. व्हिडीओ कॉल, स्टेटस, फोटो शेअरिंग, ग्रुप चर्चा आणि ऑनलाइन व्यवहारामुळे WhatsApp हे लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. पण त्याचबरोबर वैयक्तिक नंबर उघड होण्याची भीतीही वाढली होती. अनेकांना अनोळखी लोकांचे कॉल, फेक मेसेज आणि त्रासदायक संपर्कांना सामोरे जावे लागत होते. आता मात्र कंपनीने गोपनीयतेवर भर देत युजरनेम फीचर आणल्याने परिस्थिती बदलणार आहे. हा बदल केवळ तांत्रिक नाही, तर डिजिटल स्वातंत्र्याकडे टाकलेले मोठे पाऊल मानले जात आहे.

युजरनेम सेट करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी ठेवण्यात आली आहे. Android किंवा iPhone मधील WhatsApp अॅप उघडून सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तिथे प्रोफाइलवर क्लिक केल्यानंतर Username हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ३ ते ३५ अक्षरांचे युजरनेम तयार करता येणार आहे. मात्र त्यासाठी काही नियमही ठेवण्यात आले आहेत. युजरनेममध्ये अक्षरे, अंक आणि काही विशिष्ट चिन्हे वापरता येतील, पण त्याची सुरुवात ‘www’ ने करता येणार नाही किंवा शेवटी .com, .org, .in असे शब्द वापरता येणार नाहीत. WhatsApp स्वतः तपासून हे युजरनेम उपलब्ध आहे की नाही हे सांगणार आहे. योग्य नाव मिळाल्यावर फक्त ‘Save’ किंवा ‘Done’ वर क्लिक केले की तुमचे डिजिटल नाव तयार होणार आहे.

या नव्या सुविधेमुळे विशेषतः महिला, व्यावसायिक, विद्यार्थी आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांसाठी मोठा दिलासा निर्माण होणार आहे. आता नंबर शेअर करण्याऐवजी फक्त युजरनेम देऊन संवाद साधता येणार असल्याने गोपनीयता अधिक सुरक्षित राहील. डिजिटल युगात “खासगीपणा” हीच सर्वात मोठी संपत्ती बनत चालली असताना WhatsApp ने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एकेकाळी फक्त मेसेजिंगसाठी वापरले जाणारे हे अॅप आता ओळख, गोपनीयता आणि वैयक्तिक सुरक्षिततेचे नवे व्यासपीठ बनू लागले आहे. मोबाईल नंबरचा बोजा कमी करून WhatsApp आता थेट डिजिटल ओळखीच्या नव्या युगात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *