Petrol- Diesel Rate : पेट्रोलच्या ज्वाळांनी सर्वसामान्यांचा खिसा भाजला !

Spread the love

Loading

दहा दिवसांत चौथा धक्का; कच्चे तेल स्वस्त तरी पंपावर दर मात्र बेभान

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।। देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की सरकारचे अर्थतज्ज्ञ लगेच जागतिक परिस्थितीचे पोवाडे गाऊ लागतात. पण सामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो — जगात तेल स्वस्त होत असताना आपल्या पंपावर दर रोज महाग कसे होतात? दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आणि वाहनधारकांच्या खिशाला अक्षरशः आग लागली. पेट्रोल तब्बल ₹२.६१ आणि डिझेल ₹२.७१ ने महागले. एवढ्यावरच थांबायचे नाही तर अवघ्या काही दिवसांत पेट्रोलने प्रति लिटर ₹८ चा टप्पा ओलांडला. म्हणजे गाडी चालवायची की घर चालवायचे, असा प्रश्न आता मध्यमवर्गीयांना पडू लागला आहे.

या दरवाढीचा सर्वात मोठा विनोद म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत! ब्रेंट क्रूड तब्बल ४.५५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९८ डॉलरवर आले, तर WTI क्रूडही कोसळले. पण आपल्या देशात चित्र अगदी उलटे. बाहेर तेल स्वस्त, आत पेट्रोल महाग! जणू जागतिक बाजारपेठेचा नियम भारतात उलट्या पायाने चालतो. सरकार सांगते रुपया घसरला, पश्चिम आशियात तणाव वाढला, होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे आले. पण सामान्य नागरिक विचारतो — हे सगळे संकट नेमके आमच्याच खिशावर का कोसळते? तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी नागरिकांची पाकिटे फोडण्याचा हा उद्योग किती दिवस चालणार?

मुंबईत पेट्रोलने १११ रुपयांचा टप्पा पार केला आहे. पुण्यात दर १११.७१ रुपये, कोल्हापुरात ११२ रुपयांवर, तर जळगाव आणि नंदुरबारमध्ये पेट्रोल ११३ रुपयांच्या घरात पोहोचले. डिझेलही शंभरीच्या दिशेने वेगाने धावत आहे. याचा परिणाम फक्त वाहनधारकांवर होत नाही; तर भाजीपासून बांधकाम साहित्यापर्यंत प्रत्येक वस्तू महाग होण्याची घंटा वाजू लागली आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार, मालवाहतूक महागणार आणि शेवटी त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशावर बसणार. म्हणजे पेट्रोलपंपावर सुरू झालेली आग आता बाजारपेठेत धुराचे लोळ उठवणार, हे स्पष्ट दिसत आहे.

खरे तर पेट्रोल-डिझेल हा आता इंधनाचा नव्हे तर राजकारणाचा विषय झाला आहे. दरवाढ झाली की कारणे जागतिक; आणि दर कमी झाले तर श्रेय स्थानिक! सामान्य माणूस मात्र दररोजच्या प्रवासात मीटरकडे पाहून घाबरतो आहे. दुचाकी फुल टँक करणे म्हणजे आता एखाद्या छोट्या EMI सारखे वाटू लागले आहे. एकेकाळी गाडी काढताना माणूस रस्ता पाहायचा; आता तो आधी पेट्रोलचा दर पाहतो! देश डिजिटल, स्मार्ट आणि वेगवान होत असताना पेट्रोलच्या वाढत्या किमती मात्र सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना ब्रेक लावत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *