![]()
मार्ग एकच, वेग कासवाचा; प्रवासी मात्र रोज वाहतूककोंडीत होरपळलेले
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।। पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत मेट्रो धावते म्हणे! पण ती धावते की दमछाक करत रांगते, हा प्रश्न आता प्रवाशांनाच पडू लागला आहे. शहरभर मोठमोठे खांब उभे राहिले, उद्घाटनांच्या फिती कापल्या गेल्या, फोटोसेशन झाले; पण प्रत्यक्षात मेट्रोचा वेग पाहिला तर गोगलगायीनेही लाजून बाजूला व्हावे! पिंपरी ते दापोडी एवढ्याशा साडेसात किलोमीटरच्या मार्गावरच शहराची आधुनिक वाहतूक व्यवस्था अडकून बसली आहे. त्यात निगडी विस्ताराचे काम म्हणजे “होईल… होईल…” या सरकारी आश्वासनाच्या बैलगाडीत अडकलेले! शहर वाढले, लोकसंख्या वाढली, वाहनांचा पूर वाढला; पण मेट्रोचा विस्तार मात्र अजूनही नकाश्यांतच धापा टाकतो आहे.
मेट्रो स्थानकांवर उतरल्यानंतर प्रवाशांचे खरे हाल सुरू होतात. कारण स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ना नीट बस, ना वेळेवर फीडर सेवा, ना पार्किंगची सोय! पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या स्थानकांवर वाहन ठेवायचे कुठे, हा प्रश्न प्रवाशांना भेडसावतो आहे. मेट्रोने प्रवास करा, असे सरकार सांगते; पण स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षावाल्यांच्या दयेवर जगावे लागते. परिणामी, मेट्रोपेक्षा स्वतःची दुचाकीच बरी, असा निष्कर्ष नागरिक काढत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आलेली मेट्रो स्वतःच अर्धवट नियोजनाच्या कोंडीत अडकली आहे.
याहून गंमत म्हणजे, हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे “बहुतांश काम पूर्ण” झाल्याचे सांगत मे महिन्यात सेवा सुरू करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण मे महिना संपत आला तरी मेट्रोचा पत्ता नाही! उद्घाटनाच्या घोषणा मोठ्या, पण रुळांवर गाड्या मात्र अद्याप गायब. उद्योगनगरीतील लाखो आयटी कर्मचारी, कामगार आणि विद्यार्थी रोज ट्रॅफिकमध्ये भाजून निघत आहेत; पण प्रशासनाच्या फाईली मात्र एसी केबिनमध्ये निवांत फिरताना दिसतात. शहराचा श्वास गुदमरतो आहे आणि अधिकारी अजूनही “डीपीआर मंजुरीच्या प्रतीक्षेत” असल्याचे सांगत आहेत.
खरे तर मेट्रो ही केवळ वाहतुकीची योजना नाही; ती शहराच्या भविष्यातील जीवनवाहिनी असते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये तिची अवस्था पाहिली तर जणू एखाद्या अर्धवट पुलासारखी झाली आहे. नागरिकांना आधुनिक शहराचे स्वप्न दाखवले, पण प्रत्यक्षात दिला तो धूळ, ट्रॅफिक आणि रखडलेले प्रकल्प! आज गरज आहे ती घोषणांची नाही, तर वेगवान निर्णयांची. अन्यथा उद्योगनगरीतील नागरिक उद्या असा प्रश्न विचारतील — “मेट्रो आली नेमकी प्रवाशांसाठी, की फक्त जाहिरातींसाठी?”
