पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी आशियात गाजवला तिरंगा !

Spread the love

Loading

आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांचा भव्य सत्कार; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।।पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाने नोंद व्हावी असा प्रेरणादायी सोहळा निगडी प्राधिकरण येथे उत्साहात पार पडला. नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या आशियाई व आंतरराष्ट्रीय सवात चॅम्पियनशिप २०२६ तसेच हिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा दिमाखात फडकवणाऱ्या शहरातील पदक विजेत्या खेळाडूंचा श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. “छोट्या शहरातील मोठी झेप” असे वर्णन या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी केले. खेळाडूंच्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव थेट आशियाई स्तरावर झळकले असून शहरवासीयांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेमध्ये कु. गार्गी अमोल कुलकर्णी हिने सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. आर्या पवार, आकांक्षा भालेकर, समृद्धी जुगदार आणि शिवम पाटील यांनी रौप्य पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला, तर ऐश्वर्या नायक, आस्मी पाटील, वरद शेटे आणि मकरंद जुगदार यांनी कांस्य पदकांची कमाई करत आपली चमक दाखवली. हिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिपमध्ये सिद्धी जुगदार हिने कांस्यपदक मिळवत विशेष कौतुक मिळवले. “मेहनतीला पर्याय नसतो,” हे या खेळाडूंनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंचे स्वागत करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

या भव्य कार्यक्रमामध्ये केवळ खेळाडूंचाच नव्हे, तर दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, निगडी प्राधिकरण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. रामभाऊ ह. पिसे, उपाध्यक्ष मा. श्री. भाऊराव बा. खडसे आणि सचिव मा. श्री. देविदास पुं. हरमकर यांच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. सौ. शर्मिला राजेंद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी विद्यानंद भवन स्कूलचे प्राचार्य मा. श्री. सिरील जगन, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक मा. साहेबराव जाधव यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे आणि पालकांच्या सहकार्याचे विशेष कौतुक केले. प्रशिक्षकांनी आपल्या मनोगतात “पदक फक्त खेळाडू जिंकत नाहीत, त्यामागे कुटुंब, प्रशिक्षक आणि कठोर मेहनतीचा मोठा संघर्ष असतो,” असे भावनिक उद्गार काढले. भविष्यातही देशासाठी अधिकाधिक पदके जिंकण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला. “गण गण गणात बोते” या जयघोषात पार पडलेला हा प्रेरणादायी सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *