CNG सीएनजीनेही पेटवली महागाईची नवी आग

Spread the love

Loading

पेट्रोलनंतर गॅस महाग; प्रवाशांच्या खिशाला रोजचा फटका

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे २०२६ ।। महागाई नावाचा राक्षस आता सर्वसामान्यांच्या घरात सरळ खुर्ची टाकून बसलाय आणि सरकार मात्र त्याच्याकडे पाहून निवांत चहा पीत असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आधीच हैराण झालेल्या नागरिकांच्या डोक्यावर आता सीएनजीच्या महागाईचा हातोडा कोसळला आहे. गेल्या अकरा दिवसांत चौथ्यांदा सीएनजीचे दर वाढल्याने वाहनचालक अक्षरशः संतापले आहेत. “पेट्रोल महाग म्हणून सीएनजी घेतलं, आता सीएनजीच पेट्रोलसारखं धावतंय,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया अनेक चालक देताना दिसत आहेत. दिल्लीत सीएनजी दर थेट ८३ रुपयांच्या पुढे गेला, तर काही शहरांत शंभरी ओलांडण्याची वेळ आली आहे.

सीएनजीला एकेकाळी “गरीब माणसाचे इंधन” म्हटले जायचे. ऑटोचालक, टॅक्सी चालक आणि मध्यमवर्गीय कारधारकांनी पेट्रोलच्या जाचातून सुटका मिळावी म्हणून सीएनजीकडे धाव घेतली होती. पण आता त्या पर्यायालाही महागाईची लागण झाली आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, पुणे, हैदराबाद या शहरांतील दर पाहिले की सामान्य माणसाच्या छातीत धस्स होते. गाझियाबादमध्ये तर सीएनजीने थेट शंभरी पार केली आहे. “मीटर चालवायचा की संसार?” असा प्रश्न आता रिक्षाचालकांना पडू लागला आहे. महागाईचा हा डोंगर रोज उंचावत असताना सामान्य माणूस मात्र त्याखाली दबत चालला आहे.

मुंबईत सध्या दर स्थिर असल्याचा सरकारकडून गाजावाजा केला जात असला, तरी गेल्या महिन्यात झालेली पाच रुपयांची वाढ अजूनही नागरिक विसरलेले नाहीत. पुण्यात तर सीएनजीचा दर नव्वदी ओलांडून ९२ रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी प्रवासखर्च वाढणार आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होणार, हे उघड आहे. कारण रिक्षा, टॅक्सी, बस, मालवाहतूक – सगळेच या इंधनावर चालते. सीएनजी महाग झाली म्हणजे भाजीपासून बांधकाम साहित्यापर्यंत सर्व वस्तूंचे दर पुन्हा वाढणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांकडून महागाई कमी करण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या खिशाला रोज नवे चटके बसत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, वीज, घरभाडे… सर्वच आघाड्यांवर सामान्य माणूस कोंडीत सापडला आहे. “जनतेने जगायचं कसं?” हा प्रश्न आता केवळ विरोधकांचा राहिलेला नाही; तो प्रत्येक घरातील चर्चेचा विषय बनला आहे. महागाईचे हे रौद्ररूप असेच वाढत राहिले, तर उद्या वाहन रस्त्यावर कमी आणि नागरिक संतापाने रस्त्यावर जास्त दिसतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *