अखंडित रविवारी पूजेतून अहिल्यादेवींचा जागर महाराष्ट्रभर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -विशेष प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवडच्या गजबजाटात एखाद्या चौकात उभा असलेला पुतळा अनेकदा केवळ औपचारिकतेचा भाग ठरतो. जयंती आली की हार, पुण्यतिथी आली की भाषणे आणि बाकी वर्षभर धूळ खात उभे राहणारे स्मारक — हीच आपल्या समाजजीवनाची कटू वस्तुस्थिती. पण १५ जून २०१५ रोजी दीपक भोजने यांनी दोन-तीन समाजबांधवांना सोबत घेत “दर रविवारी अखंडित साप्ताहिक पूजा” सुरू केली आणि एका विस्मृतीत गेलेल्या पुतळ्याभोवती समाजभावनेचा अखंड दीप प्रज्वलित झाला. त्या काळातील नगरसेविका आशाताई शेंडगे, कार्यकारी अभियंता स्व. ज्ञानदेव जुंधारे, विजय भोजने, तत्कालीन प्रभाग अध्यक्षा सुभद्रा ठोंबरे आणि स्थानिक नगरसदस्यांच्या प्रयत्नातून उभारलेली मेघडंबरी केवळ बांधकाम राहिली नाही; ती समाजजागृतीची पवित्र जागा बनली. “रविवार” हा सुट्टीचा दिवस समाज एकत्र आणण्यासाठी निवडला गेला आणि पहिल्याच पूजेला ३० ते ४० समाजबांधव उपस्थित राहिले. त्या दिवसापासून आजपर्यंत एकही रविवार खंडित न होता पूजा सुरू आहे, हेच या चळवळीचे खरे सामर्थ्य ठरले.

सुरुवातीला पुतळ्याची साफसफाई करणाऱ्या हातांची संख्या कमी होती; पण श्रद्धेचा आवाज मोठा होता. समाजाच्या ग्रुपवर संदेश गेले, व्यक्तिगत फोन झाले, बैठका पार पडल्या आणि प्रत्येक रविवारी उपस्थिती वाढत गेली. पूजेचे फोटो राज्यभर पोहोचले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मध्यप्रदेश आणि राजस्थानपर्यंत या उपक्रमाची दखल घेतली गेली. जालना, बीड, आळंदी, स्वारगेट, सांगवी, कात्रज अशा अनेक ठिकाणी रविवारी साप्ताहिक पूजा सुरू झाली. एका साध्या उपक्रमाने समाज संघटनांचे रूप घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान, महिलांच्या हस्ते पूजा अशा अनेक विधायक गोष्टी या व्यासपीठातून घडू लागल्या. महावीर काळे, प्रदीप वाघमोडे, गोरख खामगळ, गणेश एकल, विजय महानवर, अजित चौगुले, भिवाजी शिंगटे, गोवर्धन कांबळे, निलेश वाघमोडे, विश्वास मोटे यांसारख्या समाजबांधवांनी या उपक्रमाला खांदा दिला आणि “पूजा” हा शब्द केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्याचा मंत्र ठरला.

आज या अखंड परंपरेला अकरावे वर्ष पूर्ण होत आहे. ७ जून २०२६ रोजी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि समाजातील विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शहरात भव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक उभे राहावे, ही दीपक भोजने आणि समाजबांधवांची सामूहिक इच्छा असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. “जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत दर रविवारी पूजा अखंड सुरू राहील,” हा दीपक भोजने यांचा निर्धार आज अनेकांच्या प्रेरणेचा विषय बनला आहे. गणेश एकल, सुधाकर अर्जुन, भरत महानवर, विजय महानवर, धनंजय गाडे, विजय अर्जुन, देवराम बिरगड, सुभाष हाके, अदिनाथ यमगर, सुमेध कावळे, महेश भोजने, अच्युत लेंगरे, निखिल पिसे, शहाजी धन्ने, विनोद बरकडे, महेश खताळ अनिल लंबाते ,संभाजी लासके , काका शेळके , मनोहर सुरवसे , निलेश वाघमोडे यांसारख्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ पूजा न राहता समाजमन एकत्र बांधणारी चळवळ ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *