![]()
खंडाळा-लोणावळ्यापासून देशभरातील १८ पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छतेचा जागर
पिंपरी, दि. ४ जून : पर्यावरणाचे प्रश्न आता केवळ चर्चेचे विषय राहिलेले नाहीत, तर ते मानवी अस्तित्वासमोर उभे ठाकलेले गंभीर आव्हान बनले आहेत. अशा वेळी निसर्गसंवर्धनाला अध्यात्माची जोड देत संत निरंकारी मिशनने ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त देशव्यापी हरित अभियान उभारले आहे. सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेने आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून ५ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भारतातील १८ प्रमुख पर्वतीय व पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी केवळ घोषणा नव्हे, तर कृतीची मशाल पेटविणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने यंदाच्या पर्यावरण दिनासाठी दिलेल्या ‘Beat Plastic Pollution’ या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेले हे अभियान पर्यावरणीय जबाबदारीची व्यापक जाणीव करून देणारे आहे. संत निरंकारी मिशनने “सेवा, सुमिरण आणि सद्भाव” या त्रिसूत्रीचा आधार घेत निसर्गसंरक्षणाला एक आध्यात्मिक साधना म्हणून स्वीकारले आहे. झाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा पुरस्कार करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट असल्याचा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.
या उपक्रमात स्वयंसेवक, सेवादल सदस्य, श्रद्धाळू आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता मोहीम, पथनाट्ये, जनजागृती फेऱ्या, मानवी साखळ्या आणि पर्यावरणविषयक संदेश फलकांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली जाणार आहे. ‘निसर्गाची सेवा हीच प्रभूसेवा’ हा विचार जनमानसात रुजविण्यासाठी विविध संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन हा सरकारी यंत्रणांचा एकट्याचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच हरित क्रांती घडू शकते, हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्रातील खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा आणि सोमेश्वर यांच्यासह देशभरातील १८ महत्त्वाच्या स्थळांवर हे अभियान एकाच वेळी पार पडणार आहे. पुणे झोनल प्रभारी आदरणीय श्री. अशोक अहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या संकल्पनेशी सुसंगत उपक्रम सातत्याने राबवत आहे. यंदाचे अभियानही त्याच सेवायज्ञाची प्रभावी पुढची पायरी ठरणार आहे. वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरितक्षेत्रे आणि प्लास्टिकचा विळखा यांच्याविरुद्धचा हा संघर्ष केवळ एका दिवसापुरता नसून स्वच्छ, सुरक्षित आणि हरित भारत घडविण्याचा सामूहिक संकल्प आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या इतिहासात ही मोहीम केवळ कार्यक्रम न राहता जनचळवळीचे रूप धारण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.