![]()
गुटखा, भेसळयुक्त अन्न आणि बनावट औषधांविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम; नागरिकांसाठी टोल-फ्री नंबर आणि ई-मेल जाहीर
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून २०२६ ।। राज्यातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवघ्या काही दिवसांतच कारवाईचा असा धडाका लावला आहे की, अनेकांच्या धंद्याचे धाबे दणाणले आहेत. सहा दिवसांत तब्बल २०३ ठिकाणी छापे, १०२ जणांना अटक आणि ६८ दुकाने व हॉटेलांवर टाळे ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रशासनाने दाखवलेली कठोर इच्छाशक्ती आहे. वर्षानुवर्षे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर आता थेट कायद्याचा हात पडू लागला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी केवळ प्रेक्षक राहू नये, तर या मोहिमेचे भागीदार व्हावे, असे आवाहन करत मुंढे यांनी थेट तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणाच खुली केली आहे.
आजवर अनेकदा भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट औषधे किंवा प्रतिबंधित गुटख्याची विक्री दिसत असूनही नागरिकांना तक्रार कुठे करायची याची माहिती नसते. याच अडचणीवर उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाने टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ आणि jc-foodhq@gov.in हा ई-मेल सार्वजनिक केला आहे. जेवणात भेसळ, मिठाईत बनावट रंग, औषधांमध्ये संशयास्पद दर्जा किंवा गुटखा-पानमसाल्याची अवैध विक्री दिसल्यास आता थेट तक्रार करता येणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे केवळ माहिती देण्यापुरता नसून, जनतेच्या सहभागातून भेसळखोरांविरोधात लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
मुंढे यांच्या नेतृत्वाखालील कारवाईचा परिणाम राज्यभर दिसू लागला आहे. धुळे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या धाडीत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. मुंबई-आग्रा महामार्गावरून सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश करत प्रशासनाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्याआधी नागपूरसह विविध भागांतही मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षे कायद्याला चकवा देत सुरू असलेल्या या काळ्या व्यवसायावर आता प्रशासनाची बारीक नजर असल्याचा स्पष्ट संदेश या धाडसत्रातून गेला आहे.
तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द नेहमीच कठोर निर्णय आणि शिस्तप्रिय कामकाजासाठी ओळखली जाते. नागपूर, नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रशासनात धाडसी निर्णय घेतले होते. आता अन्न व औषध प्रशासनाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. भेसळखोरांच्या साखळ्या तोडण्यासाठी प्रशासन मैदानात उतरले असताना, नागरिकांनीही जागरूक राहून संशयास्पद प्रकारांची माहिती द्यावी, हीच काळाची गरज आहे. कारण आरोग्याचा प्रश्न हा केवळ सरकारचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित असलेला सर्वात महत्त्वाचा विषय आहे.
