![]()
कॅप्चाच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; १५ जुलैपर्यंत वेगवान आणि अधिक स्मार्ट वेबसाइटचे आश्वासन
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून २०२६ ।। रेल्वेचे तिकीट काढणे म्हणजे काही प्रवासाची सुरुवात नसते, तर ती एक स्वतंत्र परीक्षा असते. मोबाईल हातात घेऊन लाखो प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर धडक देतात, पण समोर उभा ठाकतो तो कॅप्चाचा अजस्त्र किल्ला! काही वेळा कॅप्चा सोडवण्यातच इतका वेळ जातो की हवे असलेले तिकीट दुसऱ्याच कुणाच्या खात्यात जमा झालेले असते. अनेक प्रवाशांच्या या रोजच्या संतापाला अखेर रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने घेतले असून आयआरसीटीसीची नवी वेबसाइट १५ जुलै २०२६ पर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगच्या रणांगणात उतरणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जयपूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही घोषणा झाली. विद्यार्थ्यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर थेट तक्रारींचा पाढाच वाचला. “तिकीट मिळण्याआधी कॅप्चाच आम्हाला हरवतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे ही तक्रार ऐकताच रेल्वेमंत्र्यांनी जागेवरूनच अधिकाऱ्यांना फोन लावला. सरकारी बैठका, फाईली आणि समित्यांच्या फेऱ्यात विषय अडकवण्याऐवजी थेट प्रश्न विचारला – “३० दिवसांत नवीन वेबसाइट तयार होऊ शकते का?” अधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तर मिळताच विद्यार्थ्यांसमोर १५ जुलैची मुदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता प्रवाशांना केवळ आश्वासन नव्हे, तर ठराविक तारीखही मिळाली आहे.
नवीन वेबसाइट केवळ रंगरंगोटी करून आणली जाणार नाही, तर ती अधिक वेगवान, सोपी आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल असेल, असा दावा करण्यात आला आहे. आजच्या घडीला तत्काळ बुकिंग सुरू होताच सर्व्हरवर ताण येतो, पृष्ठे अडकतात आणि अनेकदा पेमेंट पूर्ण होऊनही तिकीट हातात पडत नाही. नव्या यंत्रणेमुळे हा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे. लाखो प्रवाशांच्या दैनंदिन वापरातील ही सेवा असल्याने तिच्यातील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे नवीन वेबसाइट किती वेगवान ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी राजस्थानमधील रेल्वे विकासाचाही उल्लेख केला. २०१४ पूर्वी सुमारे ६०० कोटी रुपयांवर असलेले रेल्वे बजेट आता १०,२२८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सर्वसामान्य प्रवाशासाठी खरा प्रश्न बजेटचा नसून तिकीटाचा असतो. त्याला हवी असते वेळेत मिळणारी सीट, सुरळीत चालणारी वेबसाइट आणि कॅप्चामुक्त बुकिंगची सुविधा. त्यामुळे १५ जुलैनंतर आयआरसीटीसीचे नवे रूप खरोखरच प्रवाशांच्या अपेक्षांना न्याय देते की पुन्हा एकदा जुन्याच अडचणी नव्या रंगात समोर येतात, याची उत्सुकता आता संपूर्ण देशाला लागली आहे.
