फिफा विश्वचषकात नॉकआउट रणधुमाळी; एका पराभवाने स्वप्नांचा शेवट निश्चित
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जून २०२६ ।। FIFA World Cup 2026 Round of 32 Schedule: फिफा विश्वचषक २०२६ आता अशा वळणावर येऊन पोहोचला आहे, जिथे चुकांना माफी नाही आणि दुसरी संधीही नाही. गट फेरीतील गुण, गणिते आणि समीकरणांचा खेळ संपला असून आता सुरू होत आहे खरी कसोटी. ‘राऊंड ऑफ-३२’ म्हणजे प्रत्येक संघासाठी करो किंवा मरोची लढाई. एक विजय मिळाला तर पुढचा प्रवास, पण एक पराभव झाला की विश्वविजेते होण्याचे स्वप्न क्षणात भंगणार. त्यामुळे येत्या काही दिवसांत फुटबॉलच्या मैदानावर केवळ गोलांचा वर्षावच नाही, तर तणाव, थरार आणि भावनांचाही महापूर पाहायला मिळणार आहे. जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा आता या नॉकआउट सामन्यांवर खिळल्या आहेत.
यंदाच्या विश्वचषकात प्रथमच ४८ संघांच्या नव्या फॉरमॅटनुसार स्पर्धा खेळवण्यात आली. बारा गटांमधून प्रत्येक गटातील विजेता आणि उपविजेता, तसेच तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम आठ संघ अशा एकूण ३२ संघांनी बाद फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिक स्पर्धात्मक आणि अनिश्चित ठरली आहे. दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ब्राझील, जपान, जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल, अर्जेंटिना, स्पेन आणि इतर बलाढ्य संघांसह डीआर काँगो, केप वर्दे, घाना आणि बोस्निया-हर्जेगोविना यांसारख्या संघांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसरीकडे उरुग्वे, इराण, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, स्कॉटलंड आणि कतारसारख्या संघांचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले असून यंदाचा विश्वचषक अनेक धक्कादायक निकालांसाठीही लक्षात राहणार आहे.
नॉकआउट फेरीतील सामने चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहेत. ब्राझील आणि जपान यांच्यातील संघर्षात कौशल्याची कसोटी लागणार आहे, तर नेदरलँड्ससमोर मोरोक्कोचे कठीण आव्हान उभे ठाकणार आहे. सर्वाधिक चर्चेचा सामना अर्थातच पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात रंगणार असून क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लुका मॉड्रिच या दोन दिग्गजांची लढत पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी उत्सुक आहेत. इंग्लंडसमोर प्रथमच नॉकआउटमध्ये पोहोचलेल्या डीआर काँगोचे आव्हान असेल, तर अर्जेंटिनाला केप वर्देसारख्या धडाकेबाज संघाला कमी लेखण्याची चूक परवडणारी नाही. कोलंबिया-घाना, फ्रान्स-स्वीडन, जर्मनी-पराग्वे यांसारख्या लढतींमध्येही मोठे उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२८ जूनपासून ३ जुलैपर्यंत राऊंड ऑफ-३२चे सामने रंगतील. त्यानंतर ४ ते ७ जुलैदरम्यान राऊंड ऑफ-१६, ९ ते ११ जुलैदरम्यान उपांत्यपूर्व फेरी, १४ आणि १५ जुलैला उपांत्य फेरी, १८ जुलैला तिसऱ्या स्थानासाठी सामना आणि १९ जुलैला न्यू जर्सी येथे अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आता प्रत्येक मिनिट, प्रत्येक पास आणि प्रत्येक गोल इतिहास घडवू शकतो. फुटबॉलच्या या महासंग्रामात कोणता संघ जगज्जेता होणार आणि कोणाचे स्वप्न एका चुकीमुळे भंगणार, याचा अंतिम निर्णय आता मैदानावरच होणार आहे.