जुलैच्या उंबरठ्यावर महागाईचे नवे वादळ उभे

Spread the love

Loading

पासपोर्टपासून गाडीपर्यंत वाढीचा फटका; बजेट सांभाळताना सर्वसामान्यांचा घाम फुटणार

हाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जून २०२६ ।। महिना बदलला की दिनदर्शिकेचं एक पान उलटलं, एवढंच होतं असं समजणाऱ्यांनी आता जरा पाकीट उघडून पाहावं. कारण १ जुलैपासून सर्वसामान्यांच्या खिशावर नव्या नियमांचा असा मारा होणार आहे की, पगार येण्याआधीच खर्चाची यादी तोंड वासून उभी राहणार आहे. महागाईने आधीच संसाराची दोरी ताणून धरली असताना आता पासपोर्ट, वाहन, क्रेडिट कार्ड आणि इंधनाशी संबंधित बदलांमुळे घरगुती अर्थकारणाला नव्याने झटका बसणार आहे. सरकार एका हाताने दिलासा देत असल्याचा दावा करत असले, तरी दुसऱ्या हाताने वाढीची पावतीच नागरिकांच्या हातात दिली जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी होणारे हे बदल लाखो कुटुंबांच्या मासिक बजेटचे गणित विस्कटण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

यामध्ये आधार कार्डधारकांसाठी मात्र एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबरदरम्यान आधारमध्ये ई-मेल आयडी अद्ययावत करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी यासाठी ७५ रुपये भरावे लागत होते. मात्र हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण दुसऱ्याच बाजूला पासपोर्ट काढणे मोठ्या प्रमाणात महागणार आहे. सामान्य पासपोर्टसाठीची फी थेट १,५०० रुपयांवरून २,५०० रुपयांवर जाणार असून, तत्काळ सेवेसाठी तब्बल ५,००० रुपये मोजावे लागतील. म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी आपल्या बँक खात्याची उंची मोजावी लागणार आहे. कागदपत्रांपासून प्रवासापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वाढत्या खर्चाचा फास अधिक घट्ट होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांनाही जुलैचा पहिला दिवस महागात पडणार आहे. टाटा मोटर्स, किआ, एमजी मोटर्स आणि बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. प्रवासी वाहनांपासून व्यावसायिक वाहनांपर्यंत दरवाढ लागू होणार असल्याने ग्राहकांनी आता अधिक पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यातच क्रेडिट कार्डधारकांसाठीही नियम बदलत आहेत. काही व्यवहारांवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स कमी होणार आहेत, तर काही सुविधांसाठी खर्चाची अट वाढवण्यात आली आहे. म्हणजे खर्चही तुमचाच आणि सवलतींची अटही तुमच्याच खिशावर! आर्थिक शिस्तीच्या नावाखाली ग्राहकांवर अटींचा पाऊस पाडला जात असल्याची टीका यानिमित्ताने पुढे येत आहे.

दरम्यान, १ जुलैला एलपीजी सिलिंडर आणि सीएनजीच्या नव्या दरांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरांमध्ये होणारे बदल थेट स्वयंपाकघरापासून उद्योगधंद्यांपर्यंत परिणाम करतात. दर वाढले तर घरगुती बजेटला पुन्हा तडा जाणार, तर दर कमी झाले तर तोच दिलासा ठरणार आहे. मात्र एकूण चित्र पाहता जुलैची सुरुवात सामान्य नागरिकांसाठी खर्चाचा नवा हिशेब घेऊन येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महागाईच्या वावटळीत तग धरत असलेल्या मध्यमवर्गाला आता प्रत्येक रुपयाचा हिशेब अधिक काटेकोरपणे मांडावा लागणार आहे; अन्यथा महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट कोलमडण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *