![]()
अवघ्या ७२ तासांत पाच शहरांत छापे; ९०.४२ लाखांचा संशयित साठा जप्त, बिनपरवाना औषधे आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांचा पर्दाफाश
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुलै २०२६ ।। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आला की, कायद्याची काठी मऊ असू नये. पण काही व्यापाऱ्यांनी औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली नफ्याचा असा बाजार मांडला की, माणसाच्या जीवाची किंमतही मालाच्या बिलाइतकी उरली नाही. कुठे गोरेपणाचे स्वप्न विकणाऱ्या संशयास्पद विदेशी क्रीम, कुठे परवान्याशिवाय लाखोंच्या आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन, तर कुठे रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करू न देणारी मेडिकल स्टोअर्स! या सर्व प्रकारांवर अन्न व औषध प्रशासनाने अवघ्या ७२ तासांत असा धडाका लावला की, आरोग्याशी खेळणाऱ्यांच्या धंद्यालाच हादरा बसला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ८ ते १० जुलैदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाया करत तब्बल ९०.४२ लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई नांदेडमध्ये झाली. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ‘अफराह कलेक्शन’ या दुकानावर छापा टाकला असता पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या ‘गोरी’सह विविध ब्रँडच्या ब्युटी क्रीमचा मोठा साठा आढळला. संबंधित व्यापाऱ्याकडे खरेदीची वैध कागदपत्रे नसल्याने सुमारे ३९.७० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील शुक्रवार पेठेत तर कोणताही परवाना नसताना भस्म आणि रस औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले. औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादकाचे नाव, उत्पादन तारीख किंवा मुदत यांसारख्या अनिवार्य नोंदीच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बीडमध्ये ‘मेरा रूप श्रृंगार क्रीम’ या उत्पादनावर त्वचा उजळते, डाग कमी होतात अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची नोंद घेऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि संबंधित साठाही जप्त करण्यात आला.
सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील कारवायांनी तर आरोग्य व्यवस्थेतील गंभीर वास्तव समोर आणले. सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णांना तेथूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार खरी ठरली. तपासात प्रिस्क्रिप्शन न देणे, नियमबाह्य औषधविक्री आणि मुदतबाह्य औषधांच्या अयोग्य साठवणुकीसारखे गंभीर प्रकार समोर आल्याने संबंधित स्टोअरला ‘स्टॉप अॅक्टिव्हिटी’चे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कर्करोगाच्या रुग्णाला केमोथेरपीसाठी आवश्यक इंजेक्शन बाहेरून खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर तपास करण्यात आला. अनेक नियमभंग आढळल्याने संबंधित मेडिकल स्टोअरचा विक्री परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
औषध हे उपचारासाठी असते, व्यापारातील शॉर्टकटसाठी नव्हे. सौंदर्यप्रसाधन असो वा औषध, ग्राहकांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांना कायद्याचा फास घट्ट बसलाच पाहिजे. अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम केवळ छाप्यांची मालिका नाही; ती आरोग्य व्यवस्थेला दिलेली कठोर ताकीद आहे. बिनपरवान्याचे उत्पादन, बनावट औषधे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि रुग्णांची आर्थिक पिळवणूक यांना जर वेळेत लगाम घातला नाही, तर त्याची किंमत समाजाला जीव देऊन मोजावी लागू शकते. त्यामुळे या कारवाईचा शेवट जप्तीपुरता न राहता दोषींना कठोर शिक्षा होणे आणि राज्यभर नियमित तपासण्या सुरू राहणे, हीच जनतेची खरी अपेक्षा आहे.