महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ६० टक्के काम शासकीय रुग्णालयांतच; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्पष्ट निर्देश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै २०२६ ।। राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना शासकीय रुग्णालयांतून मिळावा, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरोग्य योजनेचा मोठा निधी खासगी रुग्णालयांकडे वळण्याऐवजी सरकारी आरोग्य संस्थांना मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, या योजनेतील किमान ६० टक्के उपचार आणि सेवा शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातूनच पार पडल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही योजना खासगी रुग्णालयांसाठी नसून सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे अधोरेखित करत, शासकीय आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या आढावा बैठकीत आबिटकर बोलत होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व क्षेत्रीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेताना शासकीय रुग्णालयांची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाला दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने समन्वय ठेवून काम करावे. शासकीय रुग्णालयांतील क्लेम मंजुरीसंदर्भातील अडचणी तातडीने दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. निधीचा योग्य वापर, उपचारांची गुणवत्ता आणि रुग्णांना वेळेवर सेवा मिळणे या बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या नव्या धोरणामुळे शासकीय रुग्णालयांवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आर्थिक आणि प्रशासकीय बळ मिळून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.