![]()
रहिवासी प्रमाणपत्र, मराठी चाचणी अनिवार्य; व्यावसायिक परवान्यासाठी कडक अटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै २०२६ ।। महाराष्ट्रात नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया येत्या १ ऑगस्टपासून अधिक कठोर होणार आहे. राज्य सरकारने रस्ते सुरक्षा, स्थानिक नागरिकांशी प्रभावी संवाद आणि वाहनचालकांची जबाबदारी वाढविण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः व्यावसायिक वाहनचालकांसाठी रहिवासी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार असल्याने या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवीन लायसन्ससाठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी हे बदल आधीच समजून घेणे आवश्यक ठरणार आहे.
नवीन नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना महाराष्ट्रातील वैध रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदाराने राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा द्यावा लागेल. जर हा पुरावा उपलब्ध नसेल, तर अर्जदाराच्या पालकांनी महाराष्ट्रात किमान सहा वर्षे कायमस्वरूपी वास्तव्यास असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे राज्याबाहेरील व्यक्तींना व्यावसायिक वाहन परवाना मिळविण्यासाठी अधिक कडक निकष पूर्ण करावे लागतील.
या बदलांमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे मराठी भाषेची अनिवार्य चाचणी. विशेषतः ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब आणि ॲप-आधारित बाईक-टॅक्सी चालविणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना कार्यात्मक मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक असेल. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांशी प्रभावी संवाद साधता यावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होऊ नयेत, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहन चालविण्याचा परवाना केवळ रहिवासी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेची चाचणी उत्तीर्ण झालेल्यांनाच मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांच्या पात्रतेचे निकष अधिक कठोर होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या नियमांवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काही जण या निर्णयाचे स्वागत करत असताना, तर काहींनी त्यावरील अटींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. येत्या १ ऑगस्टपासून हे नियम प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम नवीन लायसन्स अर्जदारांसह व्यावसायिक वाहनचालकांवर कसा होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लायसन्ससाठी अर्ज करण्यापूर्वी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आता प्रत्येक अर्जदारासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.