महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – २७ सप्टेंबर – शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, फडणवीसांसोबतच्या या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये गोपनीय असे काय होते. गुप्त बैठक म्हणायला आम्ही काय बंकरमध्ये भेटलो होतो का, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
फडणवीस आणि संजय राऊत या नेत्यांमध्ये काल झालेल्या भेटीनंतर सुरू झालेल्या भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना न भेटालयला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाही. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
