जिथे पहिल्यांदा चायनीज खाल्लं, तिथेच पुन्हा जाण्याची इच्छा; FDA आयुक्तांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट २०२६ ।। Tukaram Mundhe: पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव घेतले की कारवाई, तपासणी आणि नियमांचा बडगा डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत त्यांनी प्रशासनाच्या फाईलींपलीकडे जाऊन आपल्या आयुष्यातील काही भन्नाट आठवणी सांगितल्या. लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुंढेंनी पुण्यातील पहिला प्रवास, शिक्षणातील अडथळे आणि सुरुवातीच्या संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे, पुण्यात पहिल्यांदा चायनीज कुठे खाल्ले होते, याचीही आठवण त्यांनी सांगितली. आता त्याच खाद्यपदार्थाकडे FDAचे लक्ष वळण्याचे संकेत त्यांनी दिल्याने चर्चेला चांगलाच मसाला मिळाला आहे.
पुण्यात एमएच्या प्रवेशासाठी आलेला पहिला दिवसही मुंढेंच्या आठवणीत ताजा आहे. शिवाजीनगर बसस्थानकावर उतरून ते थेट पायी विद्यापीठात गेले. प्रवेशाची शक्यता होती; पण हॉस्टेलची जागा नव्हती. एसपी कॉलेजचा पर्यायही होता, पण प्रश्न पुन्हा निवासाचाच. अखेर त्या दिवशीचा पुणे प्रवास बसस्थानक–विद्यापीठ–एसपी कॉलेज–बसस्थानक एवढाच राहिला. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि यूपीएससीच्या तयारीसोबत शिक्षण सुरू ठेवले. पुण्यात अभ्यासासाठी जयकर लायब्ररीचा आधार घेत असताना मित्राच्या खोलीत राहण्याचा अनुभवही त्यांना आला. तेथे ढेकणांचा इतका त्रास होता की, पुण्याशी झालेली त्यांची ओळख सुखद नव्हती, हे ते विनोदाने सांगतात.
मात्र या सगळ्या आठवणींपेक्षा सध्या लक्ष वेधून घेतले ते ‘चायनीज’वरील त्यांच्या वक्तव्याने. बापट रोड किंवा पाषाण रोडवरील चायनीजच्या गाड्यांवर त्यांनी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्ल्याचे सांगितले. त्यावेळी ‘चायनीज फूड’ म्हणजे नेमके काय, याचीही माहिती नव्हती, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता गेल्या काही काळात अन्नसुरक्षेबाबत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर चायनीज खाद्यपदार्थांकडेही लक्ष देण्याची मागणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे चायनीज खाद्यविक्रेत्यांची तपासणी हा FDAच्या पुढील अजेंड्यावर असू शकतो, असा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून काढला जात आहे.
मुंढेंच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील चायनीज खाद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अर्थात, कोणत्याही विशिष्ट दुकानावर किंवा विक्रेत्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले नाही. पण अन्नाच्या गुणवत्तेबाबत तडजोड सहन न करण्याची त्यांची कार्यपद्धती पाहता संकेत मात्र दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. पुणेकरांच्या ताटात चायनीज असो वा मिसळ; प्रश्न चवीचा नाही, आरोग्याचा आहे. त्यामुळे पुढील काळात FDAच्या तपासण्या कुठे पोहोचतात, याकडे खाद्यविक्रेते आणि ग्राहक दोघांचेही लक्ष लागले आहे.
