दूध-तेलानंतर आता पेयांवर नजर; शाळांजवळील जंक फूड विक्रेत्यांवरही कारवाईचा इशारा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट २०२६ ।। पुणे : भेसळखोरांनी आतापर्यंत दूध, पनीर, खाद्यतेल यांसारख्या वस्तूंमध्ये हात साफ केला; आता पेयांच्या बाटल्यांकडेही संशयाने पाहण्याची वेळ आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरोधात कारवाईची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून मद्यापासून मद्यार्क नसलेल्या शीतपेयांपर्यंत उत्पादन, गुणवत्ता आणि लेबलिंगची तपासणी केली जाणार आहे. गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने हा विषय अधिक गांभीर्याने घेतला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पेयजलाची गुणवत्ता असो किंवा पेयांचे उत्पादन आणि लेबलिंग—सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून “कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”
‘पुणे लोकल कनेक्ट’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भविष्यवेध : संवाद भविष्याचा’ या कार्यक्रमातील ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखतीत मुंढे बोलत होते. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी उद्योग, प्रशासन आणि ग्राहक या तिन्ही घटकांची जबाबदारी अधोरेखित केली. कायद्याने ठरवलेल्या मानकांनुसारच अन्नपदार्थ असले पाहिजेत, असे सांगताना त्यांनी चरबीयुक्त, अतिखारट आणि अतिसाखरयुक्त पदार्थांच्या वाढत्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली. भेसळयुक्त अन्न, निकृष्ट खाद्यपदार्थ आणि विषारी ताडी-दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियम पाळणारा उद्योग, प्रभावी नियमन करणारे प्रशासन आणि जागरूक ग्राहक हीच सुरक्षित अन्नव्यवस्थेची त्रिसूत्री ठरणार आहे.
मुंढे यांनी याचवेळी शाळांच्या ५० मीटर परिसरातील जंक फूड विक्रेत्यांवरही कारवाईचा इशारा दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची भूमिका त्यांनी मांडली. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या कारवाईसाठी स्वतंत्र पथके, तपासणीचे निश्चित वेळापत्रक किंवा ठोस कार्यपद्धती याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग, पालक आणि FDA यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे घोषणा कडक असली तरी तिची अंमलबजावणी किती कडक होते, यावरच या मोहिमेचे यश अवलंबून राहणार आहे.
प्रशासनाच्या कारवाईबरोबरच मुंढे यांनी तरुणांना नेतृत्वाचा धडाही दिला. “यशाचे श्रेय स्वतःकडे आणि अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे म्हणजे नेतृत्व नव्हे,” असे सांगत त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. अधिकारी बदलला की व्यवस्था कोलमडते, अशी स्थिती बदलण्यासाठी व्यक्तीपेक्षा व्यवस्था मजबूत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी अपयशाने खचून न जाता त्यातून शिकावे आणि पुन्हा उभे राहावे, असा संदेशही त्यांनी दिला. आता पेयांपासून जंक फूडपर्यंत FDAचा फोकस वाढत असताना प्रश्न एकच—मुंढेंच्या इशाऱ्यानंतर भेसळखोर सुधारणार की पुन्हा कारवाईचा बडगा उचलावा लागणार?
