![]()
वीजवाहिन्यांपासून मोटरपर्यंत तांब्याचा वापर; वाढत्या जागतिक मागणीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट २०२६ ।। महागाईने आधीच घराचे बजेट कोलमडलेले असताना आता घरातल्या वीज उपकरणांकडूनही ‘आम्ही येतोय महाग होऊन’ असा इशारा मिळत आहे. कारण तांब्याच्या किमतीतील वाढीने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगासमोर नवे आव्हान उभे केले आहे. ऑगस्टमध्ये भारतातील तांब्याचा दर सुमारे १,४०० रुपये किलोच्या आसपास पोहोचला होता. बाजारातील आकडेवारीनुसार जुलैअखेरीस MCX कॉपर सुमारे १,३४० रुपये किलोवर होता, तर ऑगस्टच्या सुरुवातीला तो १,३३५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. त्यामुळे तांब्याच्या किमतीचा दबाव कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर पडू लागला तर त्याचा काही हिस्सा ग्राहकांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे.
तांबे म्हणजे फक्त घरातील तांब्याचे भांडे नव्हे; आधुनिक विद्युतव्यवस्थेचा तो कणा आहे. पंख्यांची मोटर, एसीची कॉइल, फ्रिजचे कॉम्प्रेसर, गीझर, इलेक्ट्रिक मोटर्स, केबल, ट्रान्सफॉर्मर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तांब्याचा वापर होतो. त्याची विद्युतवाहकता उत्तम असल्याने ऊर्जा कार्यक्षम उपकरणांसाठी तांबे महत्त्वाचा ठरतो. त्यात आता इलेक्ट्रिक वाहनांची वाढ, सौर-पवन ऊर्जा प्रकल्प, बॅटरी स्टोरेज आणि एआय डेटा सेंटरसाठी वाढणारी वीज पायाभूत सुविधा यामुळे जागतिक मागणीवर आणखी ताण आला आहे. BHPनेही अलीकडेच वाढत्या AI आणि स्वच्छ ऊर्जेमुळे तांब्याच्या मागणीला बळ मिळत असल्याचे नमूद केले आहे.
भारताची परिस्थितीही वेगळी नाही. International Copper Association Indiaच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशातील तांब्याची मागणी ९.३ टक्क्यांनी वाढून तब्बल १.८७८ दशलक्ष टन झाली. बांधकाम, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, ग्राहक वस्तू आणि औद्योगिक क्षेत्रातील विस्तारामुळे ही मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे हरित तंत्रज्ञानाशी संबंधित तांब्याची मागणीही वेगाने वाढत आहे. म्हणजे भारत जितका अधिक विद्युतीकरणाकडे, EV आणि नवीकरणीय ऊर्जेकडे धावतोय, तितकी तांब्याची गरज वाढणार आहे. आणि पुरवठा वाढवणे लगेच शक्य नसल्याने बाजारात किमतीचा दबाव कायम राहू शकतो.
मात्र तांबे महागले म्हणजे उद्यापासून एसी, फ्रिज आणि पंख्यांच्या दुकानात किंमतपट्टी बदलणार, असा सरळ अर्थ काढणे चुकीचे ठरेल. कंपन्या कच्च्या मालाचा खर्च स्वतःच्या मार्जिनमधून किती झेलतात, उत्पादनक्षमता किती आहे, बाजारातील स्पर्धा किती तीव्र आहे आणि ग्राहकांची मागणी कशी आहे, यावर अंतिम किंमत ठरेल. पण तांब्याचा भाव दीर्घकाळ चढाच राहिला तर उत्पादन खर्चाचा दबाव नक्की वाढेल. त्यामुळे एसी घ्यायचा आहे, फ्रिज बदलायचा आहे किंवा घराचे वायरिंग करायचे आहे, त्यांनी ‘आता घेऊ की नंतर?’ हा प्रश्न नुसता दुकानदाराला नव्हे, तर आपल्या बजेटलाही विचारण्याची वेळ आली आहे. महागाईचा डबा आधीच भरलेला असताना तांब्याने त्यावर आणखी झाकण ठेवले आहे!
