![]()
AMCAला विलंब झाला तर पर्याय शोधावे लागतील; दरवर्षी ३६ ते ४० लढाऊ विमानांची गरज, Su-57वर अद्याप निर्णय नाही
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर २०२६ ।। भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या संख्येत होत असलेली घट आता केवळ आकडेवारी राहिलेली नाही, तर ती थेट संरक्षण सज्जतेशी जोडलेली बाब बनली आहे. एअर चीफ मार्शल एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत भारतीय हवाई दलाला पुढील काही वर्षे दरवर्षी किमान ३६ ते ४० लढाऊ विमानांची भरती करावी लागेल. सध्या हवाई दलाकडे २९ फायटर स्क्वॉड्रन्स असून अधिकृत गरज ४२ स्क्वॉड्रन्सची आहे. संरक्षण प्रकल्पांना होणारा विलंब ऑपरेशनल क्षमतेवर परिणाम करू शकतो, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या मते तंत्रज्ञान उपलब्ध होईपर्यंतच त्याचा लष्करी फायदा असतो; प्रतिस्पर्धी त्यापुढे गेला तर उशिरा मिळालेले तंत्रज्ञान आपली उपयुक्तता गमावू शकते.
याच पार्श्वभूमीवर तेजस मार्क-१ए, तेजस मार्क-२, ११४ बहुउद्देशीय लढाऊ विमानांचा MRFA प्रस्ताव आणि पाचव्या पिढीचे AMCA हे प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. मात्र AMCA किंवा इतर प्रकल्पांना आणखी विलंब झाला, तर पर्यायी फायटर प्लॅटफॉर्मचा विचार करावा लागू शकतो, असे एपी सिंह यांनी सांगितले. रशियाने भारताला Su-57 विमानांची ऑफर दिली आहे; मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. MRFA करार या आर्थिक वर्षात अंतिम करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. HALकडून दरवर्षी २४ पेक्षा अधिक विमाने तयार करण्याची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्वदेशी उत्पादन, परदेशी खरेदी आणि प्रगत तंत्रज्ञान या तिन्ही आघाड्यांवर वेग वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
थिएटर कमांडच्या रचनेबाबतही एपी सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. भारतीय हवाई दल थिएटर कमांडच्या विरोधात नसून तिची रचना आणि अंमलबजावणी अत्यंत काळजीपूर्वक व्हावी, असे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरमधील अनुभवामुळे या चर्चेला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तान आणि चीनच्या सहकार्याने विकसित होणाऱ्या पाचव्या पिढीच्या फायटर विमानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली; मात्र केवळ अत्याधुनिक विमानामुळे युद्धाचे चित्र ठरत नाही, तर संपूर्ण नेटवर्क आणि लष्करी व्यवस्थेतील समन्वय महत्त्वाचा असतो, असे स्पष्ट केले. दरम्यान, फ्लायदुबईच्या घटनेतील भारतीय वैमानिक स्मित मच्छर यांच्या धैर्याचेही त्यांनी कौतुक केले. संदेश स्पष्ट आहे—विमानांची संख्या वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वेळेत मिळवणे, यातील विलंब आता हवाई दलाला परवडणारा नाही.
