भेसळखोरांवर FDAचा घणाघात, लाखोंचा माल जप्त

Spread the love

Loading

१८ आस्थापनांवर कारवाई; मुंबईतील पाच ठिकाणांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर २०२६ ।। सणासुदीच्या तोंडावर मिठाईचा गोडवा वाढतो; पण त्या गोडव्यामागे भेसळीचा कडवटपणा लपला असेल तर ग्राहकांच्या आरोग्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक मोहीम राबवली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांत करण्यात आलेल्या कारवाईत संशयित भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि चुकीचे लेबल असलेले खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. एकूण १०,८३६ किलो/लिटरहून अधिक साठा, अंदाजे ३० लाख ८१ हजार रुपयांचा, कारवाईत ताब्यात घेण्यात आला.

या मोहिमेचा सर्वात धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड पूर्व येथे समोर आला. Gurukrupa Dairy Products या आस्थापनावर कारवाई करत FDAने जवळपास ४,६४६ किलो भेसळयुक्त व चुकीचे लेबल लावलेले तूप, रिफाइंड सूर्यफूल तेल आणि वनस्पतीजन्य चरबीचा साठा जप्त केला. या मालाची किंमत सुमारे १५ लाख १५ हजार ५९७ रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे. FDAच्या म्हणण्यानुसार, तेल, वनस्पतीजन्य चरबी आणि तुपाचे मिश्रण करून पांढरे व पिवळे तूप तयार केले जात होते आणि ते ‘Pooja Ghee’ या दिशाभूल करणाऱ्या लेबलखाली विकले जात होते. परिसरात उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भावही आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कारवाईचा फटका केवळ मालाडपुरता मर्यादित राहिला नाही. मुंबईतील Gufran Seekh Corner, Versova, BJRS Gallops Restaurant, Mahalaxmi Racecourse, Dreamer Hospitality Pvt Ltd, Bandra West आणि Mirari, Bandra West या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. या पाच आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे गंभीर अन्नसुरक्षा उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर निलंबित करण्यात आले. Gallops Restaurantमध्ये रेफ्रिजरेटरमधील बर्फावर रक्त व केचपचे डाग, जिवंत झुरळे-मुंग्या, फाटलेल्या पॅकिंगमधील कच्चा माल आणि पाण्याचा साठा आढळल्याचे FDAच्या कारवाईचा संदर्भ देणाऱ्या अहवालात नमूद आहे.

पुणे विभागात सांगली, पुणे आणि कोल्हापूरमधील आस्थापनांवर कारवाई करत गूळ, पेढा, बेसन लाडू, खवा, मोदक, तूप, स्किम्ड मिल्क पावडर आणि पनीर असा साठा जप्त करण्यात आला. चंद्रपूरमध्ये Ashok Agro Productsच्या गोदामातून सुमारे ३,३१० किलो चहा पावडर जप्त करण्यात आली. जळगाव, नांदेड, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूरमध्येही मावा-पेढा, तूप, तेल, मिरची पावडर आणि इतर खाद्यपदार्थांवर कारवाई झाली.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कारवाईची खरी परीक्षा आता पुढे आहे. साठा जप्त होणे ही पहिली पायरी; दोष सिद्ध झाल्यानंतर सातत्याने कठोर कारवाई झाली, तरच भेसळखोरांच्या धंद्याला खऱ्या अर्थाने लगाम बसेल. ग्राहकांनीही संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास FDAकडे तक्रार नोंदवावी. FDAने यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *