सणासुदीपूर्वी राज्यभर कारवाई; ३२ हजार किलोहून अधिक संशयित अन्नसाठा जप्त, १२ परवाने निलंबित
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर २०२६ ।। सणासुदीला घरात गोडधोड आणायचे आणि ऑनलाइन मागवलेले खाद्यपदार्थ निर्धास्तपणे खायचे, अशी ग्राहकांची मानसिकता असते. पण अन्नाच्या या चमकदार पॅकेजिंगमागे काय सुरू आहे, हा प्रश्न महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत FDAने ३२,०२३ किलो/लिटर संशयित, भेसळयुक्त, निकृष्ट अथवा अस्वच्छ अन्नसाठा जप्त किंवा नष्ट केला. त्याची किंमत सुमारे १ कोटी ३६ लाख २० हजार ७३५ रुपये आहे. मोहिमेत ६४ आस्थापनांची तपासणी झाली आणि १२ अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. ३६ आस्थापनांना सुधारणा नोटिसाही देण्यात आल्या.
मुंबईतील Swiggy Instamartच्या बॅलार्ड इस्टेट येथील डार्क स्टोअरमध्ये FDAच्या अधिकाऱ्यांना जे आढळले ते ग्राहकांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. हे केंद्र Swinsta ENT Private Limited चालवते. तपासणीत अन्न हाताळण्याच्या परिसरात जिवंत उंदीर, उंदरांनी कुरतडलेल्या १० किलोच्या तांदळाच्या पिशव्या, सांडलेले तांदूळ, साठवण क्षेत्रात उंदरांची विष्ठा आणि अन्नपदार्थांवर फिरणारे जिवंत झुरळे आढळल्याचे FDAने सांगितले. अन्नसाठ्याजवळ अस्वच्छ आणि वापरात असलेले स्वच्छतागृहही आढळले. परिणामी संबंधित परवाना तातडीने निलंबित करण्यात आला.
फक्त ऑनलाइन किराणा साठवणूक केंद्रावरच कारवाई थांबली नाही. कांदिवलीतील Acculogicx Supply Chain Solutions Pvt. Ltd. या Amazonशी संबंधित गोदामात सांडपाणी साचणे, अन्न व बिगर-अन्न वस्तूंची अपुरी विभागणी, खाद्य पॅकेजिंगजवळ रसायनांचा साठा आणि तापमान नोंदींचा अभाव यांसारख्या त्रुटी आढळल्या. Suleman Usman Mithaiwala, Jain Sweet & Bhelpuri House, Sadguru Sweets and Farsan Mart, Go Green Food Hospitality, Swad Snacks Corner, Lucknowi Kebab आणि Zaika Moradabadi Hotel यांच्याविरोधातही स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, राज्याच्या इतर भागांतही कारवाईचा फास आवळण्यात आला. खवा, मावा, पेढे, तूप, खाद्यतेल, बर्फी, सुकामेवा, गूळ, मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा संशयित साठा कारवाईच्या कक्षेत आला. सांगलीतील मिरज MIDCमध्ये १,८६८ किलो संशयित निकृष्ट हळद पावडर, किंमत ६.५३ लाख रुपये, जप्त करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूविरोधातील कारवाईत १४ FIR दाखल करून १५ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे १.३९ कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केल्याचे FDAने सांगितले.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईचा संदेश स्पष्ट आहे—सणाच्या ताटात पैसा नव्हे, तर सुरक्षित अन्न असले पाहिजे. ग्राहकांनीही केवळ ब्रँडचे नाव पाहून निश्चिंत न होता पॅकेजिंग, स्वच्छता, उत्पादनाची माहिती आणि विक्रेत्याची विश्वसनीयता तपासणे गरजेचे आहे. कारण अन्नातील भेसळ दिसत नाही; तिचा फटका मात्र शरीराला बसतो.
