सेवेतून जागृतीचा प्रकाश!

Spread the love

Loading

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील शेकडो सेवादार समागमस्थळी दाखल; २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समालख्यात आध्यात्मिक सोहळा

महाराष्ट्र 24-पिंपरी-चिंचवड, ७ ऑक्टोबर २०२६ : सेवा करायची तर मनापासून, भक्ती करायची तर अहंकार बाजूला ठेवून आणि समर्पण करायचे तर स्वतःला विसरून—याच भावनेने संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी रंगणार आहे. २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या समागमासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून शेकडो सेवादार समागमस्थळी दाखल झाले असून सेवाकार्याला वेग आला आहे. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात होणाऱ्या या सोहळ्याचा यंदाचा विषय ‘जागृती’ आहे. म्हणजे दिवे किती लावले यापेक्षा अंतःकरणात किती उजेड झाला, याचा हा हिशेब!

समागमाच्या तयारीत बांधकामापासून शामियाने, सजावट, स्वच्छता, पाणी आणि भोजन व्यवस्थेपर्यंत विविध सेवा सुरू आहेत. मुख्य प्रवेशद्वारही आकार घेत असून ते श्रद्धाळूंचे केवळ स्वागत करणार नाही, तर प्रेम, समरसता आणि एकत्वाची आठवण करून देणार आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत सेवेत रमलेले सेवादार पाहिले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—काम करणाऱ्या हातांना थकवा असला तरी चेहऱ्यावर समाधान आहे. सेवा ही नोकरी नसते, तिची पावती पगारात मिळत नाही; ती मनाच्या खात्यात जमा होते. म्हणूनच तन सेवेत, धन परोपकारात आणि मन प्रभुस्मरणात अर्पण झाले की जीवनाचे खरे कल्याण साधते, असा संदेश या समागमातून दिला जात आहे.

हा संत समागम म्हणजे केवळ चार दिवसांचा कार्यक्रम नव्हे, तर माणसाला माणसाशी जोडणारा आत्मीयतेचा उत्सव आहे. विविध भाषा, संस्कृती आणि सामाजिक स्तरांतील श्रद्धाळू येथे एकत्र येऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ची अनुभूती घेणार आहेत. सेवा, सत्संग, सुमिरण आणि प्रेम यांच्या संगतीत अंतर्मनातील अंधार दूर करून जागृतीचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा हा प्रयत्न आहे. समागमात येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी सुविधा, सत्कार आणि आपुलकीच्या व्यवस्था करण्यात येत असून, या मानवतेच्या महापर्वासाठी बंधू-भगिनी आणि सज्जन भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *