SIR प्रक्रियेत ‘अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार’ म्हणून नोंद झालेल्यांना दिलासा; महाराष्ट्रासह सात राज्यांत नव्याने गणना अर्ज स्वीकारणार
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। मतदार यादी शुद्ध करण्याच्या नावाखाली पात्र मतदाराचे नावच यादीबाहेर गेले, तर लोकशाहीच्या या स्वच्छतेचा उपयोग काय? या प्रश्नाची दखल घेत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या काही मतदारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अनुपस्थित’, ‘स्थलांतरित’, ‘मृत’ आणि ‘दुबार’ (ASDD) अशी नोंद झालेल्या, गणना अर्ज दिले गेले होते; मात्र ते परत न मिळाल्याने ज्यांची नावे प्रारूप यादीत आली नाहीत, अशा मतदारांना आता अंतिम यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबरला दिलेले निर्देश दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड या सात राज्यांना लागू आहेत.
आयोगाने संबंधित मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना नव्याने प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. अशा मतदारांची बूथनिहाय यादी मतदान केंद्रांवर, पंचायत भवनांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे. बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांनी संबंधित मतदारांशी प्रत्यक्ष भेट, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधून अर्ज पोहोचवायचे आहेत. मतदारांना जुन्या EPIC क्रमांकाच्या आधारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ECINET ॲपवरूनही गणना अर्ज भरता येईल.
स्थलांतरित मतदारांसाठीही आयोगाने मार्ग मोकळा केला आहे. त्याच राज्यात दुसरीकडे राहायला गेलेल्यांना नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाचा तपशील, पत्त्याचा पुरावा व निवेदनासह अर्ज करता येईल; त्यासाठी स्वतंत्र Form 8 देण्याची गरज नाही. बेघर मतदारांकडे पत्त्याचा पुरावा नसल्यास BLO चा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाईल. अर्जांची छाननी मतदार नोंदणी अधिकारी कायद्यातील नियम २१(१) नुसार करतील. पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत राहावे आणि दुबार नोंदणीही होऊ नये, यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारण्याचे निर्देश आहेत. मतदारांनी आपले नाव आणि वगळण्याचे कारण तपासून संबंधित BLO किंवा निवडणूक अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधावा
