![]()
पुण्यात दहा दिवसांत १३ हजार ८८९ वाहनांची नोंदणी; एकूण खरेदीत १६.२ टक्क्यांची घट, मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत ६२.४ टक्क्यांची भरघोस वाढ.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळीचा मुहूर्त, शुभ खरेदीची परंपरा आणि वाहनांच्या आकर्षक सवलती असूनही पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीत आखडता हात घेतल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या दहा दिवसांत १३ हजार ८८९ नव्या वाहनांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी याच सणासुदीच्या तुलनात्मक कालावधीत १६ हजार ५८२ वाहनांची नोंदणी झाली होती. म्हणजेच यंदा तब्बल २ हजार ६९३ वाहनांची घट झाली असून, नोंदणीत १६.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्ष आकडेवारीने मात्र बाजारातील मरगळ उघड केली आहे. केवळ सणासुदीचा उत्साह म्हणजे ग्राहकांच्या खिशात पैसा आहे, असे समजण्याची चूक वाहन उद्योगाने करू नये.
या घसरणीच्या चित्रात इलेक्ट्रिक वाहनांनी मात्र आशेचा किरण दाखवला आहे. यंदा दहा दिवसांत २ हजार ४२० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली, तर गेल्या वर्षी ही संख्या १ हजार ४९० होती. म्हणजेच तब्बल ९३० वाहनांची वाढ आणि ६२.४ टक्क्यांची झेप! एकूण वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा गेल्या वर्षीच्या सुमारे ९ टक्क्यांवरून यंदा १७.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यात १ हजार ८९९ इलेक्ट्रिक दुचाकी आणि ४२९ इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. मात्र, पारंपरिक वाहनांच्या नोंदणीत घट झाली आहे. दुचाकींची संख्या १० हजार २१४ वरून ९ हजार २४५, तर कारची नोंदणी ४ हजार २१९ वरून ३ हजार २३९ वर आली आहे. रिक्षांची नोंदणीही ५४१ वरून १०९ वर घसरली आहे.
पुणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत झालेली वाढ सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. इंधनावरील खर्च आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा आहे. मात्र, एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत असताना एकूण वाहन खरेदी घटण्यामागील कारणांचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. वाढता वाहनखर्च, आर्थिक नियोजन आणि ग्राहकांची बदलती खरेदीक्षमता यांचा बाजारावर परिणाम होत आहे का, याचा अभ्यास गरजेचा आहे. कारण वाहनांच्या जाहिरातींनी रस्ते भरले तरी ग्राहकांच्या खिशात पैसा नसेल, तर शोरूममधील झगमगाटाचा उपयोग किती? दिवाळीच्या खरेदीचा खरा कौल आकडेवारीने दिला आहे; तो नजरेआड करून चालणार नाही.
