महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ८ ऑक्टो. – पुणे – ऑनलाइन फसवणुकीपासून ते सोशल मीडियावरील बदनामीचे प्रकार रोखत आता अशा गुन्ह्याचा तपास आता पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबर करणार आहे. पुण्यातील ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र सायबरने हाती घेतला आहे.
सर्वच क्षेत्रांत डिजिटल माध्यमाचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे देशात सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. सायबर गुन्ह्यांना मर्यादा नसल्याने असे गुन्हे उघड करताना अनेक अडचणी येतात. पण त्यावर मात करत मॉडर्न टेक्नॉलॉजीचा पोलीस वापर करून सायबर गुन्हेगारांना बेड्या ठोकतात. राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्य़ाशी चर्चा केली. या चर्चेत सायबर गुन्हे दाखल करण्यापासून ते उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार पुणे येथील फसवणुकीच्या गुन्ह्याचा पहिला तपास महाराष्ट्र सायबर करणार आहे. सायबर गुन्हे उघड करण्यासाठी अधिकाऱ्य़ाची नेमणूक करण्यात आली आहे. तपास सुरू केल्यामुळे महाराष्ट्र सायबरला आता पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणार आहे.
मुंबईत 2015 ते 2019 काळात सायबरच्या 6769 केसेस मध्ये 2054 आरोपीना अटक
2015 ते 2019 काळात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी) राज्यात 180 गुन्हे दाखल असून 106 गुन्हे उघड
ऑपेरेशन ब्लॅक फेसमध्ये राज्यात माहिती व तंत्रज्ञान आणि पॉक्सो कायद्यानुसार एकूण 151 गुन्ह्यात 48 जणांना अटक.
40 टक्के गुन्हे वाढले
राज्यात ऑनलाईन फसवणूक, बदनामी करणे, फिशिंग, ईमेल, मोबाईल हॅकिंग,पोर्नोग्राफी, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यात 40 टक्के वाढ झाली आहे. तर दुसरीकडे वेबसाईट हॅक करणे, डेटा चोरी यांसारखे सायबर वॉरफेर चीन आणि पाकिस्तानकडून होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत सायबर गुन्हे वाढले आहेत. ऑनलाईन पेमेंटद्वारे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्र सायबर पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. – यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर