डिसेंबरअखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा नियमित सुरू

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – मुंबई – देशांतर्गत विमानसेवेत डिसेंबर अखेरपर्यंत सातत्य येईल तसेच प्रवासी कुठलीही भीती न बाळगता पूर्वीप्रमाणे विमान प्रवास करू शकतील, असा दिलासादायक विश्‍वास केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्‍त केला आहे.

कोरोना महारोगराई आणि लॉकडाऊनमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. स्थिती नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकारने 33 टक्के क्षमतेसह 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे. विमान वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 13 हजार 76 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. अनलॉकच्या विविध टप्प्यात नागरिकांच्या विमान वाहतुकीचे प्रमाण वाढले. 2 तसेच 3 ऑक्टोबरला 1 लाख 76 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती पुरी यांनी दिली.

लॉकडाऊन होण्याअगोदर 25 मार्चपूर्वी दररोज 3 लाख प्रवासी विमान प्रवास करीत होते. सण, उत्सवाच्या काळात नागरिकांच्या विमान प्रवासात वाढ होईल. ऑक्टोबर अखेरपर्यंत 2 लाख प्रवासी दररोज विमान प्रवास करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. दिवाळी ते वर्षअखेरपर्यंत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या कोरोना काळापूर्वी म्हणजेच दररोज 3 लाखांपर्यंत पोहोचेल. 2021 च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत विमान सेवा कोरोना काळापूर्वीच्या स्थितीत पोहोचेल, असेही ते म्हणाले.

दोन आठवड्यात खुले होतील 75 टक्के वाहतूक मार्ग

सणासुदीच्या काळात मागणी लक्षात घेता नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत 75 टक्के विमान वाहतुकीचे मार्ग सुरू करण्यासंबंधी पाऊल टाकले आहे. तूर्त 45 टक्के क्षमतेसह देशांतर्गत विमान वाहतूक सुरू आहे. मुंबईवरून 30 टक्के म्हणजेच 300 विमानांची सेवा सुरू आहे. कोरोनापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून दररोज 1 हजार विमाने टेकऑफ-लॅन्ड करीत होती. देशांतर्गत विमान सेवा 50 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत वेगाने पोहोचेल, असा विश्‍वास मंत्रालयाचे सचिव प्रदीप खरोला यांच्याकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *