‘इसिस’चे पाच संशयित दहशतवादी सीरियातून कर्नाटकात

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . -बेंगलोर – मूळ बंगळूरचे असणारे सात संशयित दहशतवादी सीरियाला गेले होते. त्यापैकी दोघांचा तेथे मृत्यू झाला. पाचजण कर्नाटकात परतले असून बंगळूरसह देशातील महत्त्वाच्या शहरांना धोका असल्याचे राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) कळवले आहे.

येथील एम. एस. रामय्या रुग्णालयात सेवा बजावणारा आणि बसवणगुडीतील रहिवासी डॉ. अब्दुर रहमान याला गेल्या महिन्यात एनआयएने अटक केली होती. त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. गुरुप्पनपाळ्या येथील सात युवक अचानक बेपत्ता झाले होते. एनआयए अधिकार्‍यांनी संबंधित कुटुंबांच्या सदस्यांकडून माहिती घेतली. ते युवक कुठे गेले, याची कुणालाच माहिती नसल्याचे दिसून आले.

बेपत्ता युवक सौदी अरेबियाला गेले होते. तेथून ते इराण सीमेवरून सीरियामध्ये दाखल झाले होते. अमेरिकेच्या सैन्याचा सीरियामध्ये ‘इसिस’च्या दहशतवाद्यांबरोबर संघर्ष सुरू आहे. त्या लढ्यामध्ये उतरण्यासाठी ते सर्व युवक गेले होते.

सोशल मीडियावर ग्रुप तयार करून या युवकांची ‘इसिस’मध्ये भरती करण्यात येत होती. निवड झालेल्या युवकांना जुन्या मद्रास रोडपलीकडे असणार्‍या घरात प्रशिक्षण देण्यात येत होते. इराक, सीरियासह काही देशांमध्ये अमेरिकेसह काहीजणांकडून मुस्लीम लोकांवर अन्याय केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन युवकांना केले जात होते. त्यासाठी शपथ घ्यावयास लावण्यात येत होती. सौदी अरेबियात राहणारा दहशतवादी इक्बाल जमीर हा त्यांना आर्थिक मदत करत होता. पासपोर्ट, व्हिसासह सर्व प्रकारची मदत तो करत होता. बांगलादेशात बंदी घालण्यात आलेल्या हज-उल या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य असल्याचे समजते. डॉ. अद्बुर रेहमान हा बंगळुरात इसिसची संघटना तयार करत होता. त्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून तो संघटनेसाठी काम करत होता. गेल्या दोन वर्षांपासून विविध शहरांत घातपात घडवण्याचा कट तो आखत होता.

उच्चशिक्षित युवक टार्गेट

डॉ. रहमान सिरियाला जाऊन परतला होता. अमेरिकी सैन्याकडून होणार्‍या हल्ल्याची माहिती, फोटो, व्हिडीओ चित्रीकरण करून तो परतला होता. डॉक्टर, इंजिनिअर, पदवीधर आणि तंत्रज्ञान क्षेत्राची संपूर्ण माहिती असणार्‍या 20 ते 25 वयोगटातील युवकांना हेरण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *