एसटी कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी महामंडळाची भन्नाट आयडिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो .- प्रतिनिधी – मुंबई – राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळातील एक हजार एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच रोजगार उपलब्ध होणार आहे. पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करूनही राज्यात निम्म्या गाड्या सुरू नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. त्यामुळे काम नसलेल्या कामगारांचा समावेश करून महामंडळाने पार्सल आणि कुरिअर विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये करोना नियंत्रणाचे प्रमाण कमी-अधिक स्वरूपात आहे. दुर्गम भागातील खेड्यातही एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. काम नाही तर पगार नाही, हा तिढा सोडवण्यासाठी महामंडळात रोटेशन पद्धतीने कामगारांना काम देण्यात येत आहे. मात्र यामुळे पगार कमी येत असल्याने एसटी कामगारांमध्ये नाराजी आहे.

खासगी कंपनीला एसटीमधून पार्सल आणि कुरिअरसेवेची मुभा आहे. प्रवासी एसटीमध्ये मर्यादित स्वरूपात जागा उपलब्ध असते. यामुळे पार्सल सामानाची मर्यादा येते. उलट एसटीच्या मालवाहतूक ट्रकमुळे मोठ्या प्रमाणात पार्सल आणि कुरिअर पोहोच करता येणे शक्य आहे. पार्सल-कुरिअरचे राज्यभरात काम सुरू केल्यास महामंडळाच्या तिजोरीतही भर पडेल. या कामासाठी किमान एक हजार मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सध्या काम नसलेल्या कामगारांचा यात समावेश करून हा प्रश्न सुटू शकेल, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मालगाड्यांतून पार्सल आणि कुरिअरसेवा करण्यात येईल. मालवाहतूक विभागाअंतर्गत ही सेवा असेल. यासाठी खूप व्यापक स्तरावर नियोजनाची गरज आहे. सध्या त्यादृष्टीने एसटी महामंडळ काम करत आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

एसटीच्या रिकाम्या टपांवर किंवा बसस्थानकांवरील उपलब्ध जागेत पार्सल वाहतूक योजना राबवली जात आहे. एसटी महामंडळ ही योजना स्वत: राबवत होते. गेल्यावर्षी यवतमाळ येथील खासगी कंपनीला यासाठी नियुक्त करण्यात आले. या कंपनीला परवानाधारक म्हणून २६ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०२२ या काळासाठी नियुक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *