खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच आली अजित पवार यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो -गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आपल्यावर अन्याय झाला असून देवेंद्र फडणवीसांना एकनाथ खडसे जाहीरपणे जबाबदार ठरवत असल्यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान पहिल्यांदाच यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे.

अनेकांच्या भेटीगाठी राजकीय जीवनात होत असतात. त्यानुसार मला काही जण भेटून गेले असल्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळबेर समजू नये. भाजपचे सरकार असताना आम्हीदेखील त्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, मला कित्येक वर्ष तुम्ही ओळखता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मला एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती, मी तुम्हाला ती दिली आहे.

दरम्यान नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास असल्याची प्रतिक्रिया जळगावात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी दिली होती. एकनाथ खडसेंच्या पक्षांतरासंबंधी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले होते की, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *