शैक्षणिक वर्ष दोन महिने पुढे जाणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – पुणे – दि. २०ऑक्टो – यंदाचे 2020-21 चे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे पाच महिने झाले तरी अद्याप सुरू झालेले नाही. नोव्हेंबरनंतर हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखादेखील अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे शैक्षणिक वर्ष दोन महिने पुढे ढकलण्याचा विचार सुरू केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान निश्चित होते. बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याचे (रजिस्ट्रेशन) कामदेखील जुलै-ऑगस्टदरम्यानच होते. मात्र, यावर्षी ऑक्टोबर संपत आला तरी कोणतेच नियोजन झालेले नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आले. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, राज्य सरकारने राज्यातील कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन 15 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या.

यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून स्वतंत्र शैक्षणिक पोर्टल तयार करून ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्यास सरकारने सुरुवात केली. त्यासाठी ‘टिचर अ‍ॅप’ विकसित करण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यास डिसेंबर उजाडला, तरी मे-जून या कालावधीत या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा घेण्याचे धोरण शालेय शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येत आहे. हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *