ठाकरे सरकारकडून शेतक-यांची घोर फसवणूक : विरोधी पक्ष नेते फडणवीस

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी -सिंधुदुर्ग – दि. २४ ऑक्टो – राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जीवितहानी व मालमत्तेचंही नुकसानही झालं आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारनं १० हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारवर फसवणुकीचा आरोप करत त्यांनी टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतक-यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार रुपए हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतक-यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारनं शेतक-यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. किमान शेतक-यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असं वाटलं नव्हतं. हा शेतक-यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसगार्ने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *