मंत्रिमंडळात कुठलेही बदल होणार नाहीत; पवारांच्या वक्तव्यामुळे गूढ वाढले

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी -सिंधुदुर्ग – दि. २४ ऑक्टो -एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचे पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते तिथेच राहतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केले.

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे हे राष्ट्रवादीमध्ये येणार हे निश्चित होताच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका मंत्र्याला पद सोडावे लागणार, अशी चर्चा होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नावे घेतली जात होती. शरद पवार यांनी या सगळ्या गोष्टींवर खुलासा केला.

ते म्हणाले, पक्ष प्रवेशाच्या आधी खडसे यांची पक्षातील अनेक नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर माझ्याशीही चर्चा झाली. यातील कुठल्याही चर्चेत त्यांनी एका शब्दानेही कशाचीही अपेक्षा केली नाही. माध्यमांनी मात्र अनेक प्रकारच्या बातम्या दिल्या. त्याला काहीही अर्थ नाही. जे जिथे काम करत आहेत, तिथेच राहतील, असे सांगत, मंत्रिमंडळात कुठलेही बदल होणार नाहीत, असे पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. पवारांच्या या वक्तव्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके काय मिळणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केले, तितकेच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५-६ आमदार निवडून येतील
गेल्या ४० वषार्पासून एकनाथ खडसेंनी अनेकांना न्याय मिळवून दिला. विकासाची दृष्टी असणारे, प्रशासनावर वचक असणारा नेता राष्ट्रवादी आले त्याचा आनंद आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल. जळगाव जिल्ह्यातून किमान ५-६ आमदार एकनाथ खडसेंमुळे निवडून येईल असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला.

अजित पवार नाराज नाहीत!
खडसेंच्या पक्ष प्रवेशाला अजित पवार उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शरद पवारांनी त्याचेही खंडन केले. मीडियामध्ये लोक परस्पर काहीतरी जाहीर करून टाकतात. मला आश्चर्य वाटतं. कोरोनाच्या काळात आमच्यातील अनेकांना त्रास झाला. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना दिल्या आहेत. त्यातून एखादा सहकारी नसेल तर गडबड आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले.

पक्षप्रवेश सोहळा
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कुणी किती भूखंड घेतले ते दाखवतो : खडसे
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणा-यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे खडसे यांनी म्हटले. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.

त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन
४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील खडसे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *